बैल वाहतूक करणाऱ्या चालकाला मारहाण केल्याची तक्रार

जातीवाचक शिवीगाळ व गैरवर्तनाचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा/जालना : बैलाची वाहतूक करणारे वाहन अडवून चालकाला मारहाण केल्याची तक्रार जालना तालुका पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. यावेळी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा तसेच तोंडात शेण कोंबल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, २३ मे रोजी कन्हैयानगर टी-पॉईंट परिसरात हा प्रकार घडला. परमेश्वर हिवाळे हे मारुती कांबळे यांच्या मालकीचा बैल आठवडी बाजारातून वाहनाने घेऊन जात होते. त्यावेळी काही व्यक्तींनी वाहन अडवून कागदपत्रे आणि बैल खरेदीची पावती दाखविण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर हिवाळे यांना वाहनातून खाली उतरवून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच जातीवाचक अपशब्द वापरून गैरवर्तन करण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यांच्या मुलाला मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेचे चित्रीकरण करून संबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणात व्यंकटेश भगत, अर्जुनसिंह, रितेश देशमुख, शिवराम पिछाडे, एसरकटे आणि सोमेश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी स्वतःची ओळख बजरंग दलाचे कार्यकर्ते अशी करून दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीच्या आधारे जालना तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.



