बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २३ कोटी ३३ लाखांची मदत; बुलढाण्याला सर्वाधिक १० कोटी ७८ लाखांचा निधी*

७ हजार ६५८ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा; मदत थेट बँक खात्यात जमा होणार – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा : जून आणि जुलै २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी तब्बल १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची सर्वाधिक मदत मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील ७ हजार ६५८ बाधित शेतकऱ्यांच्या ५ हजार ४८९.९१ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी ही मदत मिळणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मंजूर झालेली १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांची मदत ही राज्यासाठी मंजूर झालेल्या एकूण निधीतील मोठा हिस्सा आहे. त्यामुळे खरीप हंगामातील नुकसानीने आर्थिक अडचणीत आलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

“नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंजूर झालेला निधी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी निश्चितच आधार देईल,” असे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

मदत व पुनर्वसन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, चक्रीवादळ व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे. राज्यातील ११ हजार २०७.७९ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीसाठी १७ हजार २४५ शेतकऱ्यांना एकूण २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

यामध्ये अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील ९ हजार ६८३ बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी बुलढाणा जिल्ह्याला १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपये मिळणार आहेत.

पुणे विभागातील पुणे व सातारा जिल्ह्यांतील ६ हजार ५६५ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी १३ लाख २२ हजार रुपये, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ६६१ शेतकऱ्यांसाठी ३८ लाख ८७ हजार रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ बाधित शेतकऱ्यांसाठी ४१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

बाधित शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली मदत DBT प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही मदत रक्कम शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाच्या परतफेडीसाठी अथवा वसुलीसाठी वळती करून घेऊ नये, अशा कडक सूचना सर्व बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत पूर्णपणे त्यांच्या उपयोगासाठी उपलब्ध होणार आहे.

मदत वाटप करताना एकाच शेतकऱ्याला एकाच नुकसानीसाठी दुबार लाभ मिळणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याच हंगामात यापूर्वी मदत मिळालेल्या लाभार्थ्यांना त्याच क्षेत्रासाठी पुन्हा मदत देताना द्विरुक्ती होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी आणि वितरित मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत ७ हजार ६५८ शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला १० कोटी ७८ लाख ५७ हजार रुपयांचा निधी हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानीतून सावरण्यासाठी मदतीचा हात मिळाला आहे.

“शेतकऱ्यांच्या हिताला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button