मुक्ताईनगर चौकातील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; वाहतूक कोंडीवर तातडीने कारवाईची मागणी

मुक्ताईनगर :
मुक्ताईनगर शहरातील मुख्य चौक परिसरात दुकानांसमोर दुचाकी व चारचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी राहत असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या बेशिस्त पार्किंगमुळे वाहनचालकांसह पादचारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने मुक्ताईनगर पोलिसांकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मुख्य चौकातील विविध दुकानांसमोर ग्राहकांकडून रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. परिणामी रस्त्याची उपलब्ध जागा कमी होऊन वाहतुकीचा वेग मंदावतो. विशेषतः गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही हा प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. रस्त्यावर अनधिकृत किंवा अडथळा निर्माण करणारे पार्किंग झाल्यास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होण्याबरोबरच आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होऊ शकतो. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने किंवा इतर अत्यावश्यक सेवांची वाहने अडकल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे पोलिस प्रशासनाने मुक्ताईनगर चौकाची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी ‘नो-पार्किंग’ क्षेत्र निश्चित करणे, वाहतूक सूचना फलक लावणे, नियमित वाहतूक नियंत्रण करणे आणि बेशिस्त पार्किंगविरोधात प्रभावी मोहीम राबविणे, अशा उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. येत्या दोन दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावेळी युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक प्रशांत टोंगे, विधानसभा उपाध्यक्ष महेंद्र मुंढाळे, नगरसेवक मस्तान कुरेशी, माजी नगरसेवक निलेश शिरसाठ, तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, संतोष माळी, संजय काळे, सुभाष माळी, विशाल नारखेडे आदी उपस्थित होते.
आता पोलिस प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते आणि मुक्ताईनगर चौकातील बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



