मुक्ताई मंदिर प्रवेशद्वाराच्या मागणीला वेग; पालखी आगमनापूर्वी भूमीपूजनाची भाविकांची अपेक्षा

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक मुक्ताईनगरात येत असतात. अशा परिस्थितीत भुसावळ रोड ते जुने कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर भव्य प्रवेशद्वार (कमान) उभारण्याची मागणी आता केवळ धार्मिक भावनेपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती भाविकांच्या सुविधा, वाहतूक नियोजन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरत आहे.श्री. लक्ष्मण रमेश सापधरे यांच्या नेतृत्वाखाली समस्त भाविक, वारकरी संप्रदाय व नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात या मार्गावर आकर्षक व भव्य प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली आहे. नगरपंचायतीमार्फत शहरातील विविध ठिकाणी प्रवेशद्वारे उभारली जात असताना, राज्यासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताई मंदिराच्या मुख्य मार्गाकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.येत्या १८ तारखेला आदिशक्ती संत मुक्ताईंची पावन पालखी पंढरपूरहून मुक्ताईनगरात आगमन करणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवेशद्वाराच्या कामाचे भूमीपूजन झाल्यास तो वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक आणि भावनिक क्षण ठरेल, अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे.वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेसाठीही महत्त्वाची गरजपालखी सोहळा, यात्रा आणि धार्मिक उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि गर्दीचे नियोजन ही प्रशासनासमोरील प्रमुख आव्हाने ठरतात. अशा वेळी मुख्य मार्गावर उभारण्यात येणारे प्रवेशद्वार हे केवळ धार्मिक प्रतीक न राहता, भाविकांना योग्य दिशा दाखविणारे आणि वाहतूक व्यवस्थापनाला पूरक ठरणारे केंद्रबिंदू ठरू शकते. यामुळे पोलीस, महसूल व नगरपंचायत प्रशासनाला गर्दी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासही मदत होईल.भाविकांनी मुक्ताई झेरॉक्सलगतच्या जागेवर प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली असून, या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जळगाव, मुख्यमंत्री कार्यालय (CMO) तसेच नगर विकास संचालनालय यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पावन पालखी आगमनापूर्वी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन भूमीपूजन करण्यात यावे, अशी अपेक्षा वारकरी संप्रदाय, भाविक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने धार्मिक भावना, नागरिकांच्या सुविधा आणि कायदा-सुव्यवस्थेचा समतोल साधत या मागणीवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.



