उष्माघाताला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून घोषित करण्याच्या हालचाली; आमदार एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचा ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून समावेश करावा आणि त्याद्वारे बाधितांना मदत मिळावी, यासाठी आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत अतारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते.
यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात या विषयावर महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. १६ व्या वित्त आयोगाने उष्माघाताला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून वर्गीकृत केले असल्याची माहिती शासनाने दिली आहे. या शिफारशीच्या आधारे, उष्माघाताला आता ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्याची पुढील कार्यवाही एनडीएमए (NDMA) कडून केली जात आहे. आमदार खडसे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे, उष्माघाताच्या मुद्द्यावर प्रशासकीय स्तरावर ठोस पावले उचलली जात असून, भविष्यात या नैसर्गिक आपत्तीने बाधित होणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.




