खानदेशखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

शिक्षण आणि चिकाटीच्या बळावर यशोशिखर गाठले; जे. ई. स्कूल, मुक्ताईनगरमध्ये डॉ. पांडुरंग पाटील यांचा सत्कार

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

यशस्वी व्यक्ती आपल्या मातृसंस्थेत परत येऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात, तेव्हा त्या भेटीचे महत्त्व अधिकच वाढते. अशीच प्रेरणादायी भेट मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी जे. ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे पार पडली. विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा आंबेजोगाई येथील नामांकित सीबीएसई शाळेचे मुख्याध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांनी आपल्या मातृसंस्थेला सदिच्छा भेट देत शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. पांडुरंग पाटील यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी इंग्रजी विषयात प्रा. डॉ. ए. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.गेली आठ वर्षे त्यांनी कर्नाटकातील एका प्रतिष्ठित सीबीएसई शाळेत मुख्याध्यापक म्हणून यशस्वीपणे काम पाहिले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. सध्या ते आंबेजोगाई येथील नामांकित सीबीएसई शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून, त्याचबरोबर सीबीएसईचे मास्टर रिसोर्स पर्सन म्हणून राज्यभरातील शिक्षकांना इंग्रजी विषयाच्या आधुनिक अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देतात. विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे आणि व्यक्तिमत्त्व विकास उपक्रमही ते नियमितपणे आयोजित करतात.यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना डॉ. पाटील म्हणाले, “आजचा विद्यार्थी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाढत आहे. त्यामुळे शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता, प्रश्न विचारण्याची सवय आणि इंग्रजी भाषेत आत्मविश्वासाने संवाद साधण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला पाहिजे.”यावेळी त्यांनी इंग्रजी व्याकरण सोप्या पद्धतीने शिकविणे, विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य विकसित करणे तसेच बोर्ड आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त अशा प्रभावी अध्यापन पद्धतींची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शिक्षकांना अध्यापनात नवे दृष्टिकोन मिळाले, तर विद्यार्थ्यांमध्ये उच्च ध्येय गाठण्याची प्रेरणा निर्माण झाली.कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी ज्येष्ठ शिक्षक एस. डी. कुरकुरे सर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी होते. यावेळी प्राचार्य चौधरी यांच्या हस्ते डॉ. पांडुरंग पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य व्ही. एम. चौधरी म्हणाले की, “डॉ. पांडुरंग पाटील यांचा जीवनप्रवास हा विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या बळावर यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होईल.”या प्रसंगी उपप्राचार्य व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक के. आर. कवळे, व्ही. डी. बऱ्हाटे, एस. एम. वाढे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समारोपाप्रसंगी एस. आर. ठाकूर सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button