शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या केलीआत्महत्या मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला

सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील घटना परिसरात हळहळ
आत्महत्येमुळं एक घर उजाडलं
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :- शंकर शिवरकर
सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील शेतकरी कैलास अर्जुन सानप (वय 45) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कर्जाचा डोंगर कसा उतरायचा या चिंतेने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आत्महत्येमुळं एक घर उजाडलं
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, कैलास सानप हे शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करीत होते. शेतीतील वाढता उत्पादन खर्च, उत्पन्नातील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींमुळे ते काही काळापासून मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न मोठ्या उत्साहात पार पाडले होते. मुलीचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी त्यांनी सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, त्या आनंदाला अल्पावधीतच दुःखाची किनार लाभली आणि कुटुंबाच्या कर्त्या व्यक्तीच्या निधनाने सानप कुटुंब हादरून गेले आहे.
मृत कैलास सानप यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, विवाहित मुलगी, भाऊ आणि अन्य नातेवाईक असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच गावकरी, नातेवाईक आणि शेतकरी बांधवांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कैलास सानप यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी तसेच त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, याबाबतचा अंतिम निष्कर्ष संबंधित यंत्रणांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
एकुलत्या एक मुलीचे हात पिवळे करून तिच्या सुखी आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका शेतकरी पित्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे. बळीराजाच्या वेदनादायी संघर्षाची ही घटना अनेकांना अंतर्मुख करून गेली आहे.
कर्जाचा डोंगर कसा उतरायचा या चिंतेने त्यांनी या जगाचा निरोप घेतला



