‘विश्वास, विकास आणि जनकल्याण’ अभियानाला प्रारंभ; भाजप कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
जळगाव, प्रतिनिधी : केंद्रातील मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर राबविण्यात येणाऱ्या “मोदी सरकारची १२ वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण” या विशेष अभियानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शहरातील ब्राम्हण सभा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अभियानाची रूपरेषा, उद्दिष्टे व विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील विविध विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
या अभियानांतर्गत ५ जून ते २१ जून २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिरे, तसेच ‘आपत्काल के ५१ साल’ या विषयावरील विशेष कार्यक्रमांसह विकसित भारत संकल्प संमेलन, विशेष जनसंपर्क अभियान, प्रगती पथ यात्रा, स्वच्छता अभियान, पत्रकार परिषद आणि विविध जनजागृती उपक्रम राबविले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि गेल्या १२ वर्षांत झालेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सरकारच्या योजनांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यशाळेस आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (पूर्व) चंद्रकांत बाविस्कर, भाजपा जिल्हाध्यक्ष (पश्चिम) राधेश्याम चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष (जळगाव शहर) दीपक सूर्यवंशी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. राजेंद्र फडके, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, महापौर दिपमाला काळे, डॉ. केतकी पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेमुळे आगामी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांना दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



