विधान परिषद निवडणूक: उमेदवारी अर्जाच्या अखेरच्या दिवशी महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान

मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील विधान परिषदेच्या १६ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी महायुतीसमोर बंडखोरीचे संकट उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. अधिकृत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर काही ठिकाणी मित्रपक्षांतील स्थानिक नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेत सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरू होती. मागील निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे असल्याने त्यांनी दावा कायम ठेवला होता. मात्र, स्थानिक पातळीवर भाजपकडे अधिक लोकप्रतिनिधी असल्याचा दावा करत भाजपनेही जागेसाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर महायुतीच्या वाटाघाटींमध्ये भाजपच्या बाजूने निर्णय होत सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करून नाराजी उघडपणे व्यक्त केली. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका करत स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना डावलल्याचा आरोप केला.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातही बंडखोरीची ठिणगी पडली आहे. भाजपने राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना नेते रमेश बारसकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. “पालकमंत्री संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत नाहीत, तर केवळ काही मोजक्या आमदारांच्या हितासाठी काम करत आहेत,” असा आरोप बारसकर यांनी केला.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी संयमित भूमिका घेतली. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता
विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांचे गणित अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशा परिस्थितीत महायुतीतील बंडखोरीमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी नाराज इच्छुकांची समजूत काढणे आणि त्यांना अधिकृत उमेदवारांच्या बाजूने उभे करणे, हे महायुतीच्या नेतृत्वासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.



