मुक्ताईनगरात अनधिकृत प्रायव्हेट क्लासेसचा सुळसुळाट; प्रशासन कारवाई करणार का?

समर व्हेकेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ?
मुक्ताईनगर शहरात सध्या समर व्हेकेशनच्या नावाखाली विविध प्रायव्हेट क्लासेसचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः भाजपा कार्यालयाच्या बाजूला सुरू करण्यात आलेल्या स्केटिंग क्लासमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. लहान मुलांना स्केटिंगचे प्रशिक्षण दिले जात असले, तरी संबंधित क्लासेसना आवश्यक परवानगी आहे का, प्रशिक्षक पात्र आहेत का, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, उन्हाळी सुट्टीचा फायदा घेत काही क्लासेस चालकांकडून पालकांची आर्थिक लूट सुरू असल्याची भावना निर्माण झाली आहे. मुलांच्या भविष्याच्या आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या नावाखाली मोठ्या फी आकारल्या जात आहेत. मात्र त्या बदल्यात विद्यार्थ्यांना योग्य सुविधा, सुरक्षितता आणि प्रशिक्षित मार्गदर्शन मिळते का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित स्केटिंग क्लाससाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचे समोर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे क्लासेस सुरू असताना गटशिक्षण अधिकारी व क्रीडा विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, स्केटिंगसारख्या क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित कोच, सुरक्षा साहित्य आणि आवश्यक नियमांचे पालन अत्यंत गरजेचे असते. मात्र संबंधित क्लासमध्ये अशा निकषांचे पालन केले जात आहे का, याची कोणतीही खातरजमा होताना दिसत नाही. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.
मुलांच्या बालविकासाचा विचार करता, अशा उपक्रमांवर नियंत्रण ठेवणे आणि योग्य परवानगी प्रक्रिया राबविणे ही प्रशासनाची जबाबदारी मानली जाते. मात्र मुक्ताईनगरात सुरू असलेल्या अनधिकृत क्लासेसकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
आता सर्वसामान्य नागरिकांची नजर गटशिक्षण अधिकारी आणि क्रीडा विभागाच्या भूमिकेकडे लागली असून, अनधिकृतपणे सुरू असलेल्या क्लासेसवर कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



