जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

१०००० पेक्षा अधिक गाणी लिहिणारे महाकवी वामन दादा कर्डक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना महाराष्ट्रातील घराघरात पोहचविणारे सर्वश्रेष्ठ महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्म सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला . वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षी वडिल ताबजी यांचे निधन झाले . घरी तशी १८ एकर शेती होती मात्र शेती करण्या करिता लागणारी साधन सामग्री व पैसा नसल्याने त्यांना शेतीतून फारसे उत्पन्न घेता येत नसे त्यामुळे आई सईबाई वेगवेगळी मोलमजुरी करून प्रपंच चालवीत असे . प्रपंचाला हातभार लागावा म्हणून वामनदादा यांनी लहानपणी बरीच वर्षे गाई – म्हशी चारल्या . पुढं मोठ्या भावा ला रेल्वेत नौकरी मिळाली तेंव्हा आई , ते भावासोबत मुंबईला आले . शिवडी येथील बी डी डी चाळीत राहत असताना ते एका शिक्षकाकडं बाराखडी शिकले , हिंदी पुस्तकं घरीच वाचू लागले . दुकानाच्या पाट्या वाचून वाचून त्यांनी आपले ज्ञान वाढविले . काही दिवसांनी वामनदादांना सुद्धा रेल्वे , हिंदुस्थान लिव्हर , नोट प्रेस आदी ठिकाणी नौकरी मिळाली पण त्यांनी एक एक महिन्याच्या आतच नौकरी सोडली आणि कधी गिरणीत काम करून , कधी आईस्क्रीम विकून , तर कधी कोळसा विकून त्यांनी आपली गुजराण केली . हे सर्व करत असताना मात्र त्यांना चित्रपट सृष्टीत आपण काम करावे , फिल्मी हिरो व्हावे असे वाटत असे म्हणून त्यांनी मिनर्व्हा फिल्म स्टुडिओ , करदार फिल्म स्टुडिओ , रणजित फिल्म स्टुडिओ मध्ये कामगार / कलाकार म्हणून काम केले . प्रख्यात गीतकार प्रदीप यांनी रचलेल्या …… ‘ आज कितने दिनोंसे हमको गुलाम करके पुकारा है दूर हटो ये दुनिया वालो ये हिंदुस्थान हमारा है ! ‘ या प्रसिद्ध गाण्याचे त्यांनी विडंबन केले…… ‘ आज कितने दिनोंसे हमको अछूत करके पुकारा है दूर हटो ये काँग्रेस वालो ये हिंदुस्थान हमारा है ! ‘हे विडंबन त्यांनी बी डी डी चाळीतील लोकांना ऐकविले तेंव्हा लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला व इथूनच त्यांचा कवी म्हणून जन्म झाला . मग त्यांनी काही मराठी चित्रपटांना गाणी लिहिली . ‘ सांगते ऐका ‘ या सुपरहिट झालेल्या चित्रपटाची गाणी त्यांनी लिहिली आहेत . मराठी , हिंदी चित्रपटांशी त्यांचा जवळचा संबंध आला मात्र फिल्मी हिरो होण्याचे त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले . पुढं १९४३ ला नायगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेत त्यांनी उपस्थिती दिली . बाबासाहेबांचे भाषण ऐकून ते एवढे प्रभावी झाले की त्यांनी चित्रपटसृष्टीकड पाठ फिरवली. पुढं दादासाहेब गायकवाड यांचेशी त्यांचे जवळचे संबंध निर्माण झाले तेंव्हा दादासाहेबांनी त्यांना बाबासाहेबांचे कार्य आपल्याला घरोघरी पोहचविणे आवश्यक आहे असे सांगून त्यांना चळवळीत आणले . तेंव्हापासून वामनदादा गावोगावी जाऊन बाबासाहेबांचे विचार , कार्य गीतांच्या माध्यमातून सांगू लागले . तबला , पेटी व निवडक सहकारी घेऊन ते कोणतीही अपेक्षा न बाळगता प्रबोधनाचे कार्य करू लागले . बाबासाहेबांच्या विचार , कार्या बरोबरच देशभक्तीपर गीतं सुद्धा ते लिहत असत त्यांच्या ४०० देशभक्तीपर गीतांचा स्वतंत्र खंड प्रकाशित झाला आहे . स्वतंत्र हिंदी गीतांचा सुद्धा खंड प्रकाशित झाला आहे. प्रस्थापित व्यवस्था असो , सरकार विरोधी धोरण असो त्यांनी त्यास आपल्या गीतांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने विरोध केला आहे . त्यांची अनेक गीतं आजही अनेकांच्या मुखी आहेत . त्यांनी १०००० पेक्षा अधिक मराठी , हिंदी गाणी लिहिली आहेत . यवतमाळ येथील प्रा. सागर जाधव यांनी या गीतांचे १६ खंड प्रकाशित करण्याचा संकल्प बोलून दाखविला आहे . त्यातील ८ खंड प्रकाशित झाली आहेत . माधवराव गायकवाड व त्यांच्या पत्नी सुमित्रा गायकवाड यांनी वामन दादांची २२०० गाणी संकलित केली आहेत .

एवढ्या मोठ्या महाकवी असलेल्या वामनदादांचे अखेरचे दिवस मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत गेले . शेवटचे बरेच दिवस त्यांचे गंगाखेड येथील विलास जंगले यांच्या घरी गेले . नाशिक येथे असताना अखेरच्या काही दिवस आधी दादांनी .राहील विश्व मागे , जाईल मी उद्याला निर्वाण गौतमाचे , पाहिल मी उद्याला हे गीत त्यांनी रचले आणि दिनांक १५ मे २००४ रोजी शेवटचा श्वास घेतला . गंगाखेड येथील विलास जंगले यांनी त्यांच्या शेतात वामन दादांची समाधी बांधली असून त्यावर वामन दादांच्या .माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे …या ओळी लिहिलेल्या आहेत .

वामनदादांचा आज स्मृती दिवस त्या निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.जयसिंग वाघ जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button