जळगाव जिल्हा बँकेसाठी आ. एकनाथराव खडसे यांचा पाठपुरावा यशस्वी; ८०० कोटींचा निधी मंजूर

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीला राज्य सरकारने स्थगिती दिल्याने नवीन कर्ज वाटपावर परिणाम होत असल्याचा गंभीर मुद्दा आमदार एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना सहकार मंत्री महोदयांनी बँकेला ८०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर झाल्याची माहिती सभागृहात दिली.
आ. खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री महोदयांनी स्पष्ट केले की, अतिवृष्टीमुळे शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली असली, तरी बँकेचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट थांबलेले नाही. ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत बँकेने खरीप व रब्बी हंगामासाठी १०८५.६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप पूर्ण केले आहे. वसुलीची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत असल्याने सध्या बँकेकडे पुरेशी तरलता असल्याचेही सरकारने नमूद केले.
विशेष म्हणजे, बँकेच्या आर्थिक गरजांचा विचार करून नाबार्डमार्फत ८०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त फेर कर्जाचा (Refinance) प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आ. खडसे यांनी या विषयावर सरकारचे लक्ष वेधल्यानंतर, या ८०० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती सरकारने सभागृहात दिली आहे. या मोठ्या निधीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना बँकेला आता कोणतीही अडचण येणार नाही. आमदार खडसे यांनी वेळेवर हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे जिल्हयातील शेती अर्थचक्राला मोठा दिलासा मिळाला आहे.



