मुक्ताईनगर परिसरातून २७ वर्षीय महिला बेपत्ता

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :
मुक्ताईनगर तालुक्यातील एका मजुराची पत्नी अचानक घरातून निघून गेल्याची घटना समोर आली असून याबाबत पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेपत्ता महिलेचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छोटू गुलाब नावे (वय २३, व्यवसाय – मजुरी, मूळ रा. मांडवा ता. नेपानगर जि. बुरहानपूर, सध्या रा. कुंड गावाजवळ, मुक्ताईनगर) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता ते मजुरीसाठी शेतात गेले होते. दिवसभर काम करून सायंकाळी सुमारे ७ वाजता घरी परतल्यावर पत्नी घरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पत्नी व मुलांचा शोध घेतला असता घरी फक्त मुले आढळली, मात्र पत्नी घरातून कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याचे समोर आले. परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता तिचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार देत पत्नीचा शोध घेण्याची विनंती केली आहे.
बेपत्ता महिलेचे नाव बबिता छोटू नावे (वय २७) असून ती गोरी रंगाची, उंची सुमारे ५ फूट, सडपातळ बांधा अशी आहे. अंगावर पांढऱ्या रंगाची साडी असून लाल रंगाची फुले असलेली साडी परिधान केलेली होती. उजव्या हाताच्या मनगटावर ‘बबिता’ असे नाव गोंदलेले असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार संतोष खवळे तपास घेत आहे



