भुसावळ येथे ‘उमेद’ अभियान अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय ‘मुक्ताई सरस प्रदर्शन’ला केंद्रीय राज्यमंत्री श्री.रक्षाताई खडसे यांची भेट…

भुसावळ | रावेर लोकसभा अंतर्गत भुसावळ येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागा मार्फत ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय ‘मुक्ताई सरस प्रदर्शन’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनास आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देत महिला बचत गटांच्या स्टॉलना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी महिला उद्योजिकांशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या कष्ट, आत्मनिर्भरतेची वाटचाल व उत्पादित वस्तूंच्या गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच त्यांनी बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी करून महिलांना प्रोत्साहन दिले.
ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबनाची संधी देण्याच्या दृष्टीने ‘उमेद’ अभियान महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे मत यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केले. महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देणे हे या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल, स्थानिक भाजप पदाधिकारी, अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



