संत तुकोबारायांच्या तपोभूमीवर घाला : शासनाची उदासीनता आणि वारकऱ्यांचा लढा

संपादकीय
महाराष्ट्राच्या संत परंपरेचा गौरवशाली वारसा असलेल्या श्रीक्षेत्र देहू जवळील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भामचंद्र–भंडारा–घोराडा तपोभूमी डोंगरांवर सध्या बेकायदेशीर उत्खननाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सन २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाने या पवित्र डोंगरांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून अधिसूचित केलेले असतानाही, शासनाच्या आशीर्वादानेच लँडमाफिया, बिल्डर आणि एमआयडीसीमार्फत या तपोभूमीचा विध्वंस सुरू असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कापूसवाडी (ता. जामनेर) येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या उपस्थितीत संतभूमी रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण जनजागृती सभा पार पडली. संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तुकयाभक्त मधुसूदन पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सभेत संत तुकोबारायांच्या तपोभूमीवरील अन्यायाला वाचा फोडण्यात आली.
सभेत बोलताना संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा माधवी ताई यांनी येत्या १० मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या भव्य वारकरी आंदोलनाची सविस्तर माहिती दिली. तर संपर्क प्रमुख सचिन पाटील येरळीकर यांनी शासन, राजकारणी व बिल्डर यांच्या संगनमताने संतभूमीवर कसा घाला घातला जात आहे, याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला.
ही तपोभूमी केवळ डोंगर नाही, तर संत तुकाराम महाराजांसह अनेक साधकांच्या तपश्चर्येची साक्ष आहे. “देह जावो अथवा राहो” हा तुकोबांचा संदेश आज पुन्हा एकदा प्रत्यक्ष लढ्याची प्रेरणा देत आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे जर हा विध्वंस असाच सुरू राहिला, तर भविष्यात ही ऐतिहासिक व आध्यात्मिक संपदा नामशेष होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
या अन्यायाविरोधात १० मार्च २०२६ पासून मुंबई आझाद मैदानात वारकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू होणार असून, राज्यभरातील लाखो वारकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कीर्तनकार, प्रवचनकार आणि प्रबोधनकारांनी आपल्या माध्यमातून जनजागृती करावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या संघर्षाला कापूसवाडी ग्रामस्थांनी एकमताने पाठिंबा दर्शवला असून, आझाद मैदानात होणाऱ्या गाथा पारायणास उपस्थित राहण्याचा निर्धार केला आहे. सन २००७ पासून संविधानिक मार्गाने सुरू असलेला हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
संत तुकोबारायांच्या तपोभूमीवर होणारा अन्याय संतभूमी संरक्षक संघर्ष समिती कधीही सहन करणार नाही, असा ठाम इशारा देत, हा महाराष्ट्राच्या संत संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत अखंडपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



