इतिहासाची जाण ठेवणे ही काळाची गरज

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विशेष
संपदाकीय लेख
“जे आपला इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत,” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज अधिकच समर्पक ठरतात. कारण इतिहासाची जाणीव ही केवळ भूतकाळाची आठवण नसून, ती वर्तमानाला दिशा देणारी आणि भविष्य घडवणारी शक्ती आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ रोजी भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला भेट दिली होती. त्या घटनेला आता जवळपास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या भेटीमागे केवळ अभिवादन नव्हते, तर आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास उजागर करण्याचा ठाम विचार होता. बाबासाहेबांनी समाजाला हे ठामपणे सांगितले की, “आपण दुबळे नसून शूरवीरांची औलाद आहोत.”
भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभावर १८१८ च्या युद्धात वीरमरण पावलेल्या महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत. विशेष म्हणजे या नावांच्या शेवटी “नाक” हे उपपद आढळते—जसे सोमनाक, कमलनाक, रामनाक, येमनक, गोदनाक, कोठेनक, येसनक इत्यादी. हा केवळ योगायोग नाही, तर इतिहासाचा महत्त्वाचा दुवा आहे.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या बौद्ध लेण्यांमधील शिलालेखांमध्येही नावांच्या शेवटी “नाक” हे उपपद आढळते.
उदाहरणार्थ
कान्हेरी लेणी : नकनाक, अपरनाक, धमनाक, गोलनाक, मित्तनक
भाजे लेणी : अम्पिनांक अहिकीनाक
कुडा लेणी : वसुलनाक, पुसानक
बेडसा लेणी : नाशिकचा शेठ आनंदचा मुलगा पुसनाक
कार्ले लेणी : महारथी अगिमतीनाक, मितदेवनाक, उसभनाक
यावरून हे स्पष्ट होते की भीमा कोरेगावच्या क्रांती स्तंभावरील महार योद्धे आणि बौद्ध लेण्यांतील दानकर्ते हे एकाच ऐतिहासिक परंपरेतील लोक होते. त्यामुळे “आजचे बौद्ध म्हणजे कालचे महार, आणि कालचे महार हे पूर्वीचे बौद्ध होते” हा ऐतिहासिक निष्कर्ष ठामपणे समोर येतो. या सत्याची साक्ष देणारा जिवंत पुरावा म्हणजे भीमा कोरेगावचा क्रांती स्तंभ.
मात्र, या ऐतिहासिक सत्याकडे आपण गांभीर्याने पाहत नाही, ही खेदाची बाब आहे. म्हणूनच हा स्तंभ विषमतावादी, ब्राह्मणवादी विचारसरणीच्या डोळ्यात खुपतो. त्याचे संरक्षण करणे, त्याचा अर्थ समजून घेणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची अत्यंत गरज आहे.
दुर्दैवाने, आपण आपला खरा इतिहास वाचत नाही, समजून घेत नाही आणि अंगीकारतही नाही. परिणामी आपण आपल्या मुळांपासून दूर जातो. भारत देश हा बौद्ध इतिहासाने समृद्ध आहे. त्या इतिहासाचा शोध घेणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे आणि त्यातून समतेवर आधारित समाजनिर्मितीची दिशा ठरवणे हेच आपले कर्तव्य आहे. असे झाले तरच भारताला खऱ्या अर्थाने “बौद्धमय” करण्याच्या दिशेने वाटचाल होईल.
आज १ जानेवारीच्या आधी ३१ डिसेंबर साजरा करणाऱ्यांनी एक क्षण थांबून विचार करायला हवा. आपले महार शूर सैनिक रात्रभर उपाशी पोटी शिरूर ते भीमा कोरेगाव असा तब्बल २५ किलोमीटरचा पायी प्रवास करून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी इतिहास घडवणारा विजय मिळवला. त्यांनी जर केवळ मौजमजा केली असती, तर विषमतावादी ब्राह्मणशाहीचे राज्य कधीच संपले नसते आणि आपल्याला स्वाभिमानाचे दिवस पाहायला मिळाले नसते.
म्हणूनच, इतिहासाची जाण ठेवणे, त्याचा अभिमान बाळगणे आणि त्यातून प्रेरणा घेणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजले पाहिजे. कारण इतिहासाची जाणीव असलेलाच समाज आपले भविष्य उज्वल करू शकतो.



