मुक्ताईनगरमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; २० युवकांचे रक्तदान

मुक्ताईनगर – भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि मानवतावादी विचारांचे अध्वर्यू महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुक्ताईनगर येथे सोमवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेच्या मूल्यांना अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमामध्ये स्थानिक आंबेडकरी व बहुजन समाजातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संजीवनी ब्लड सेंटर, फैजपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये तब्बल २० युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने “मानवता, समानता आणि बंधुता” या डॉ. आंबेडकरांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन सकल बौद्ध समाज, मुक्ताईनगर तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी बौद्ध समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली.
स्थानिक पातळीवर समाजजागृतीसाठी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील योगदानासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेचा दिलेला संदेश समाजात रुजवण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून हा उपक्रम दर्जेदार ठरला.



