जगदंबा नवरात्र उत्सव मंडळाचा 52वा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात पार

अरुणा खंडागळे
बस स्टॅंड चौक, विदर्भ:
विदर्भातील एक प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान ठरलेला जगदंबा नवरात्र उत्सव मंडळ, बस स्टॅन्ड चौक येथे यंदा शारदीय नवरात्रोत्सवाचा 52वा वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला देवीची मातेची मूर्ती स्थापनेपासून सुरू होणारा हा सोहळा दहा दिवस चालतो, आणि अकराव्या दिवशी देवीच्या निरोप समारंभाने समारोप होतो. उत्सवकाळात जागरण-गोंधळाचे कार्यक्रम, धार्मिक पूजाअर्चा आणि भजन-कीर्तनाचे आयोजन करून भक्तजनांची मनोभावे सेवा केली जाते.
यंदाच्या वर्षी उत्सवाच्या अध्यक्षपदाची धुरा श्री. सुनील बनसोडे यांनी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्सव अत्यंत शिस्तबद्ध व भाविकांच्या सहभागाने पार पडला. उत्सवात परिसरातील नागरिक, महिला मंडळे, तरुण मंडळे तसेच लहानग्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून या देवीची ख्याती असून, दरवर्षी नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने देवीदर्शनासाठी येतात. महाप्रसादाच्या कार्यक्रमात संपूर्ण परिसरातील नागरिक एकत्र येतात, यामुळे सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते.
शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था राखली होती. देवीच्या निरोप समारंभात भव्य मिरवणूक, लेझीम पथक, ढोल-ताशा पथक यांचा सहभाग होता. महिला व युवतींनी पारंपरिक वेशभूषेत फुगड्या, भोंडला अशा लोककला सादर करत उत्सवात रंग भरला.
हा उत्सव संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा मिलाफ घडवतो, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.



