मंगरूळ नवघरे येथे महिलांनी केली घटस्थापना; दुर्गा महिला मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल

मंगरूळ नवघरे ता प्रतिनिधी आरुणा खंडागळे
चिखली येथे यंदाचा नवरात्रोत्सव विशेष ठरला, कारण याठिकाणी महिलांनीच पुढाकार घेत दुर्गा महिला मंडळ स्थापन करून स्वतःहून घटस्थापनेचे कार्य पार पाडले. या स्तुत्य उपक्रमात दत्तात्रय बाठे व विनोद गोजरे यांनी विशेष सहकार्य केले.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दुर्गा महिला मंडळाच्या वतीने हरिपाठ, भजन, गरबा, दांडिया, संगीत खुर्ची यांसारखे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि एकत्रित प्रयत्न यामुळे परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.
प्रत्येक दिवशी आरतीसाठी विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते, ज्यामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता. यामुळे कार्यक्रमास अधिक गौरव प्राप्त झाला.
दुर्गा महिला मंडळाच्या या उपक्रमामुळे महिलांच्या संघटित कामाचे उत्तम उदाहरण सगळ्यांसमोर आले असून, समाजात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे



