जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेच्या तिव्र लाटेचा इशारा, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
बुलढाणा, दि.२१ : गेल्या काही दिवसात जिल्हाच्या सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दि.२३ मे पर्यंत हवामान विभागाने जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेच्या तिव्र लाटेचा इशारा दिला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय करावे :
तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ व सछिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करण्यात यावा, प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबूपाणी, ताक इत्यादीचा वापर करावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे, घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा, बाहेर कामकाज करित असतांना मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावे, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावे, जागोजागी पानपोईची सुविधा करावी.
काय करु नये :
लहाण मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनांत ठेऊ नये, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेरील तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडे ठेवण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



