मुक्ताईनगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

मुक्ताईनगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
मुक्ताईनगर –
“जातिभेदाचा नायनाट करून समतेच्या समाजाची उभारणी करायची असेल, तर बौद्धधर्माचे धम्मचक्र फिरवावे लागेल” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा संदेश आजही तितकाच ज्वलंत आहे. याच विचारांना उजाळा देत मुक्ताईनगर येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रवर्तन चौकातील महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण होऊन करुणा, प्रज्ञा व समतेचे वचन जनतेने नव्याने दृढ केले.

उपस्थित बांधवांनी एकमेकांना अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक प्रा. डॉ. संजीव साळवे, बौद्धाचार्य सुनील अढागळे, माजी तालुकाध्यक्ष शरद बोदडे यांच्यासह अनेक मान्यवर व असंख्य अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांसह बौद्धधर्म स्वीकारला. “मी तुम्हाला संघटित करतो, शिक्षित करतो आणि संघर्षासाठी तयार करतो” हा बाबासाहेबांचा ध्यास धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या प्रत्येक सोहळ्यात जिवंत होतो.
या दिनाच्या उत्सवातून सामाजिक समता, शिक्षणाची ओढ, बंधुतेचा मार्ग व अन्यायाविरुद्धची लढाई हीच खरी बाबासाहेबांची शिकवण लोकमानसात पुन्हा चेतवली गेली. शेवटी सरण्णत्तयाने कार्यक्रमाची सांगता झाली.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हे केवळ स्मरण नाही, तर तो प्रत्येक पिढीसाठी सामाजिक क्रांतीचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.



