आदिवासी दिवस आणि रक्षाबंधनाचा अनोखा संगम — आमदार चंद्रकांत पाटील यांचा भावनिक सहभाग

मुक्ताईनगर | प्रतिनिधी –
आदिवासी बांधवांशी मनापासून जोडलेले नाते आणि बहिणींशी जिव्हाळ्याचे बंध हे एकत्र येऊन साजरा झालेला क्षण जोंधनखेडा येथे अनुभवायला मिळाला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी जागतिक आदिवासी दिवस आणि रक्षाबंधनाचा दुहेरी उत्सव आदिवासी बांधवांसह साजरा करत आपुलकीचा आणि भावनिकतेचा संदेश दिला.
जोंधनखेडा येथील शासकीय आश्रम शाळेत आयोजित कार्यक्रमास आमदार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आदिवासी पद्धतीने झालेल्या त्यांच्या स्वागताने वातावरण भारावून गेले. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांना सांस्कृतिक वारशाची झलक अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमादरम्यान आमदार पाटील यांनी शाळेसाठी मागील काळात ९० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून देत काम पूर्ण करून दिले व आदिवासी यांचे आरोग्य सुदृढ राहावे करिता 1 कोटी 18 लक्ष रुपये निधीचा आरोग्य केंद्र बांधून दिले तसेच लवकरच भव्य सांस्कृतिक हॉल उभारण्याचे आश्वासन सुद्धा दिले. त्यांनी धुळे पावरीवाडा येथे घेतलेल्या कॅम्पद्वारे अनेक आदिवासी बांधवांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्र मिळवून दिल्याचा उल्लेख करत, आज त्यापैकी ११२ प्रमाणपत्रांचे वाटप स्वतःच्या हस्ते केले. उर्वरित लाभार्थ्यांसाठी पुन्हा कॅम्प घेऊन “कोणीही जातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही” अशी ग्वाही दिली.
रक्षाबंधनाचा सोहळा हा कार्यक्रमाचा भावनिक शिखर ठरला. आदिवासी बहिणींनी आमदार पाटील यांच्या हातावर राखी बांधली, तर आमदारांनी हळुवार शब्दांत भावनिक आश्वासन दिले –
“वेळप्रसंगी काहीही गरज पडल्यास फक्त आवाज द्या, तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे.”
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील, उपतालुका प्रमुख शिवाजी पाटील, सरपंच कुर्बान तडवी, सतीश नागरे, ज्ञानेश्वर तायडे, गणेश सोनवणे, संदीप घाईत, अक्षय सोनवणे, रशीद तडवी, शेख फारुख, हकीम पठाण, रामलाल जाधव, आरीन तडवी, धरमसिंग चांदरसिंग, जवानसिंग, दाद्दुसिंग, जगदीश, दीपक वाघ सर, तसेच ग्रामस्थ, कार्यकर्ते व परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
या दुहेरी सोहळ्याने केवळ उत्सव साजरा झाला नाही, तर आदिवासी समाज आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले. आमदार चंद्रकांत पाटील यांचे हे आत्मीयतेचे पाऊल आदिवासी समाजाच्या हृदयात कायमस्वरूपी घर करून गेले.



