युद्धजन्य परिस्थिती! तरीही BSNL ची सेवा वारंवार खंडित ! , *दाव्याप्रमाणे सेवा द्यावी! ग्राहकांची मागणी. *लक्षावधीचा पगार घेऊनही अधिकाऱ्यांचे ” दिन जाओ पैसा आओ ” चे धोरण !*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला | पहलगाम मध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने नुकतेच प्रत्युत्तर दिले असुन भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असून त्यांच्या प्रत्येक नापाक हरकतीला प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना समर्थ ठरत आहे . भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्याचे संपूर्ण देशात कौतुक होत असल्याचे याप्रसंगी समजते.
हल्ली देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून हे युद्ध प्रचंड मोठे रुद्र रूप धारण करू शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु युद्धजन्य परिस्थिती असूनही बीएसएनएल अधिकाऱ्यांना त्याचे काहीच गांभीर्य नाहि असे नागरीकांकडुन बोलल्या जात आहे. तब्बल तीन महिन्यांपासून अकोला जिल्ह्यात असलेल्या अकोट CSC अंतर्गत येणाऱ्या तेल्हारा तालुक्यात तसेच हिवरखेड व अन्य ठिकाणी सेवा वारंवार खंडित होत आहे . या भागात फोन सेवा , इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत आहे. तसेच दाव्या प्रमाणे स्पीड मिळत नसल्यामुळे अनेक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. युद्धजन्य परिस्थिती ओढवल्यानंतरही बीएसएनएल कडून 4 G सेवा सुरळीत झालेली नाही.
अकोट, हिवरखेड , तेल्हारा वांगरगाव , दानापुर ,भांबेरी परिसरातील हजारो मोबाईल सिमकार्ड धारकांकडून भारत संचार निगम लिमिटेडला लक्षावधी रुपयाचे उत्पन्न मिळते. परंतु BSNL ची 4G इंटरनेट सेवा चक्क मागील दोन ते तीन महिन्यापासून खंडित होत असल्याने या सेवेवर आधारित गावातील बँका, सेतू केंद्रे, ग्राहक सेवा केंद्र, कंपनीत काम करणाऱ्या युवकांची वर्क फॉर्म होम सेवा, ग्राहकांच्या व्यक्तीगत सेवा, प्रभावित होत आहेत. याबरोबरच इंटरनेट सेवा सुरळीत चालु राहत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . यामुळे बीएसएनएलची सेवा घेत असणाऱ्या ग्राहकांचे मोठया प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. याबाबत अनेक ग्राहक बीएसएनएल विक्रेत्यांकडे वारंवार तक्रार करीत आहेत . बीएसएनएलची सेवा अनेकदा बंदच असते. परंतु यावेळी तर बीएसएनएल प्रशासन व अधिकाऱ्यांनी लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहण्याचा जणू निर्धार केलेला असून चक्क दोन ते तीन महिन्यापासून बीएसएनएलची फोरजी सेवा विस्कळीत असल्याची संतप्त बाब निदर्शनास आली आहे.
दर महिन्यात अनेक दिवस सेवा बंद असूनही बिलाची व रिचार्जची आकारणी मात्र पूर्ण केल्या जाते. ग्राहक मोठ-मोठ्या रकमेचे रिचार्ज करतात परंतु सेवा खंडतेमुळे त्यांचा अनेक दिवसाचा पैसा हा पाण्यात जात आहे . कंपनीच्या वारंवार बंद पडत असलेल्या सेवेबद्दल अनेक ग्राहकांनी दूरध्वनी व मोबाईल वरून तक्रार केली असता त्याचा काहीही उपयोग झाला नाही. इतर प्रायव्हेट कंपनीच्या सेवा सुरळीत चालतात परंतु भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीची सेवा मात्र वारंवार बंद असते व त्रासदायक होत आहे . त्यामुळे संबंधित BSNL अधिकारी व यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर विविध प्रकारची प्रश्नचिन्हे निर्माण झालेली आहे. एकीकडे हिवरखेड या गावाची व्याप्ती ग्रामपंचायत पासून नगरपरिषद मध्ये झाली असून दुसरीकडे बीएसएनएल हि कंपनी मात्र योग्य ती सेवा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. तथाकथित विकास महर्षी जिल्हास्तरीय लोकप्रतिनिधींनी आणि दूरसंचार समितीत ठाण मांडून बसलेल्या व्यक्तींनी याबाबीची गंभीरतेने दखल घेणे गरजेचे ठरत आहे.
अकोला जिल्ह्यात काहि भागात नवीनतम 4G नेटवर्क सुरु झाल्यापासून साधारण एखादा महिना उत्तम सेवा देण्यात आली ग्राहकांच्या म्हणण्यानुसार मागील अंदाजे दोन ते तीन महिन्यांपासून हिवरखेड येथील बीएसएनएल 4G नेटवर्क विस्कळीत आहे. तरी अजून पर्यंत 4G नेटवर्क व्यवस्थित झालेले नाही. तेल्हारा , अकोट हिवरखेड , वांगरगाव याबरोबरच इतर भागातही दररोज सेवा पूर्णपणे खंडित होत आहे व काही तासा नंतर परत पूर्ववत सुरू होते या त्रासाला कंटाळून अनेक BSNL ग्राहक अन्य टेलिकॉम प्रायव्हेट कंपनीमध्ये जाण्याची दाट शक्यता असून यामुळे असंख्य ग्राहक कमी होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे याचा बीएसएनएल कंपनीला मोठा फटका बसू शकतो , असे होऊ नये म्हणून कंपनीकडून याबाबत विशेष दखल घेण्यात यावी अशी मागणी याप्रसंगी होत आहे .
प्रायव्हेट कंपनीचे नेटवर्क पाच मिनिटांसाठी सुद्धा कधी बंद आढळत नाही. अशाने बीएसएनएल चा व्यवसाय कसा चालणार ? तसेच असंख्य सिमकार्ड विक्रेत्यांचा उदरनिर्वाह कसा होईल? हा ही मोठा गंभीर प्रश्न याप्रसंगी उपस्थित झालेला आहे. BSNL चे नेटवर्क बंद राहो की चालू राहो लक्षावधी रुपयांचे पगार मात्र सुरू आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीही फरक पडत नाही. ” दिन जाओ , पैसा आओ ” अशा प्रकारची “जक्कास” भूमिका निदर्शनास येत आहे.
ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सिम विक्रेत्यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काहीच प्रतिसाद मिळत नाही. ऊलट विक्रेत्यांना मैदानी खेळातील एका फुट-बॉल प्रमाणे वागणूक देण्यात येत असल्याचे समजते. हि बाब अतिशय गंभीर आहे. ग्राहकांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत मोबाईल संदेशाद्वारे पोहोचवल्या तर तांत्रिक अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया येते कि, ” असे संदेश आम्हाला पाठवू नये ” ! अखेर ग्राहकांच्या समस्या सोडवणार तरी कोण ? असा संतप्त सवालही याप्रसंगी उपस्थित होत आहे.
तसेच व्हाट्सअप ग्रुपमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर अनेक तास तक्रार सोडवण्याकरिता लागतात व कोणत्या तांत्रिक कारणामुळे सेवा खंडित झाली आहे या बाबत कोणत्याही प्रकारची माहिती ग्रुपमध्ये शेअर होत नाही . बीएसएनएल कडे महागड्या किंमतीचे यंत्र, सामुग्री, उपकरणे असून सुद्धा योग्य सेवा का मिळत नाही असा प्रश्नचिन्ह यावेळी उपस्थित होतोय? या परिस्थिती बाबत त्यांना संपूर्ण माहीत असून ते कायम स्वरूपी समस्येचे निराकरण करत नसल्याचेही निदर्शनास येत आहे. याबाबत विचारणा केली असता वरिष्ठ व कनिष्ठ सर्व अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली.
बीएसएनएल कडून दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये भ्रमणध्वनी सेवा, इंटरनेट सेवा रिचार्ज सेवा आदिं सेवांमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येतात तरी कशा ? असा संतप्त सवाल ग्राहकांकडून याप्रसंगी उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी तर विक्रेता आणि ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद-विवादही होत असल्याबाबत माहिती निदर्शनास येत आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार यामध्ये विक्रेता जबाबदार नसून या भागातील सेवा देणारे अधिकारी जबाबदार असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा आहेत. ग्राहकांनी हे समजून घेणे फार गरजेचे आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . भारत संचार निगम लिमिटेड हि कंपनी सरकारी असून कंपनी व अधिकाऱ्यांमार्फत ग्राहकांना उत्तम सर्विस दिल्याने कंपनीचा व शासनाचाही मोठा फायदा होऊ शकतो यामुळे बीएसएनएल कंपनीला टेलिकॉम क्षेत्रातुन एकमेव उत्कृष्ट कंपनी चा बहुमान सुद्धा मिळू शकतो.
प्रतिक्रिया – हिवरखेड येथील
धिरज संतोष बजाज, BSNL विक्रेता तथा सामाजिक कार्यकर्ता
यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरळीत असणे अत्यावश्यक आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून बीएसएनएल 4G इंटरनेट सेवा विस्कळीत आहे. आता युद्धजन्य परिस्थिती असूनही बीएसएनएल 4G इंटरनेट सेवा सुरळीत सुरू नसल्याने आम्हाला सैन्य दलाकडून तसेच सरकार ई. कडुन दिलेली सूचना /माहिती कशी मिळणार ? आम्ही इंटरनेट सेवा बाबत तक्रार करूनही सेवा सुरळीत झाली नाही. त्यावरून BSNL चे अधिकारी, शासन /प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी ग्राहकांच्या/ नागरिकांच्या बाबतीत संवेदनशील नाहीत असे लक्षात येते परंतु ते संवेदनशील असणे फार गरजेचे आहे.



