मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता एक वर्षापासून अपूर्ण

*मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता एक वर्षापासून अपूर्ण*”
गिव्हा कुटे येथील उपसरपंचाचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
“वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड मालेगाव -: ग्रामीण भागाला मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते तयार केले जात आहेत. मात्र स्थानिक रस्ते बांधकाम संस्थेने वेळेत काम पूर्ण न केल्याने वर्षांनंतरही हा रस्ता अपूर्णच राहतो. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करण्यास अनेक अडचणी निर्माण होतात.*एक वर्षापासून सुरू आहे रस्त्याचे काम*मालेगाव तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गिव्हा कुटे गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत करण्यात येत असलेल्या या कामाची प्रस्तावित किंमत जवळपास दीड कोटी रुपये आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू असल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. रस्ता बनविण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून त्यामध्ये टाकलेली खडी उघडी ठेवली आहे. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. *उपसरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन* या रस्त्याच्या बांधकामामुळे ग्रामस्थांना होत असलेल्या अडचणींमुळे 11 फेब्रुवारी रोजी गिव्हा कुटे गावचे उपसरपंच विठ्ठल लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडल्याचे सांगण्यात आले आहे. रस्ता बनविण्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. या रस्त्याचे बांधकाम दर्जेदारपणे पूर्ण होत नाही. संबंधित ठेकेदाराशी फोनवर संपर्क साधला असता, समाधानकारक उत्तर मिळत नाही. निर्माण कार्य सुरू असलेल्या रस्त्यावर चालताना अनेक जण पडून जखमी झाले आहेत. या निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदार यांना पाठविण्यात आल्या आहेत. सदर निवेदनात या आदिवासीबहुल गावातील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.





