मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक ११ मध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य; नागरिकांचा संताप, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तुंबलेल्या नाल्या, साचलेले सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रभागातील अनेक नाल्या तुंबलेल्या अवस्थेत असून त्यांची नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांच्या प्रादुर्भावातही वाढ होत आहे. नागरिकांनी अनेकदा संबंधित नगरसेवक आणि नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
“एक कॉल, प्रॉब्लेम सॉल” अशा घोषणा देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या मार्गी लागत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. फोनद्वारे तक्रारी नोंदवूनही त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पावसाळ्याची सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत तुंबलेल्या नाल्यांची स्वच्छता न झाल्यास पावसाळ्यात पाणी साचणे, रोगराई पसरणे आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवक तसेच मुख्याधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून स्वच्छता मोहिम राबवावी आणि प्रभागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणार का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



