‘सेवा संकल्प’अंतर्गत अकोला ठाकरे येथे आरोग्य शिबिर

माता, बालक, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी; ECG, CBCसह आरोग्यविषयक मार्गदर्शन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि. २७ : सेवा संकल्प अभियानांतर्गत उपकेंद्र अंजनीच्या वतीने श्री विघ्नहर्ता गणेश मंडळ, अकोला ठाकरे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रा. आ. केंद्र डोणगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी, मेहकर डॉ. सूरज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर घेण्यात आले.
शिबिरात गर्भवती (ANC) व प्रसूतीनंतरच्या (PNC) मातांची आरोग्य तपासणी, बालक व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात आले. तसेच नागरिकांची ECG व CBC रक्त तपासणी करण्यात आली.
आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी CPRचे महत्त्व, त्याची प्राथमिक माहिती व आवश्यक काळजी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच संतुलित आहार, आजारांपासून बचाव, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्यात आली.
या आरोग्य शिबिरासाठी SBIN टीमचे सहकार्य लाभले. आरोग्य सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.



