प्रभाग १७ मधील पराभवानंतर शिवसेनेच्या विधानसभा संघटकांचा राजीनामा.

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७ मध्ये शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला असून, या प्रभागातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ज्योती तानाजी धनगर यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शिवसेनेचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे विधानसभा संघटक महेंद्र पंढरीनाथ मोंढाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
महेंद्र मोंढाळे यांनी हा राजीनामा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर संघटनात्मक पातळीवर आत्मपरीक्षण आवश्यक असल्याची भूमिका मोंढाळे यांनी व्यक्त केल्याचे समजते. पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन केले असले, तरी अपेक्षित निकाल न लागल्याने नैतिकतेच्या भूमिकेतून राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या राजीनाम्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, पक्ष नेतृत्व पुढील निर्णय काय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



