सातोड गावाजवळील पुलावरील वाहतूक ठप्प – जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सातोड गावाजवळील पुलावरील भराव सततच्या पावसामुळे वाहून गेला आहे. परिणामी मोठे भगदाड निर्माण होऊन चार ते पाच गावांचा संपर्क तुटण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि कामकाजासाठी प्रवास करणारे नागरिक मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
ग्रामीण भागातील ही परिस्थिती प्रशासनाच्या उदासीनतेचे आणि दुर्लक्षाचे द्योतक आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत आवश्यक दुरुस्ती केली नाही, हे गंभीर आहे. केवळ निवेदनं घेऊन वा तात्पुरते तोडगे काढून प्रश्न मार्गी लागणार नाही, तर तातडीने मजबूत दुरुस्तीची आवश्यकता आहे.
आजच्या डिजिटल युगात जनतेला सोशल मीडियावर आपला आवाज उठवावा लागतो, यापेक्षा प्रशासनाने स्वतःहून जबाबदारी स्वीकारून तत्परतेने काम करणे गरजेचे आहे. शेतकरी पिकाच्या हंगामात बाजारपेठेपासून तोडले गेले आहेत, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे, तर रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळणे कठीण झाले आहे.
जनतेच्या सुरक्षिततेपेक्षा अधिक महत्त्वाचे दुसरे काही असू शकत नाही. म्हणूनच, संबंधित विभागाने तातडीची उपाययोजना करून कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करणे हेच योग्य ठरेल. अन्यथा, जनतेचा संयम सुटेल आणि त्यातून होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार ठरेल.
हा केवळ सातोडचा प्रश्न नाही, तर ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करण्याची जी सवय प्रशासनाने लावून घेतली आहे, त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.



