श्री क्षेत्र ओंकारेश्वर (भोकरी) येथील श्रावणातील एक प्रसन्न पहाट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता. प्रतिनिधी :-विकास आमोदकर.
श्रावण महिना म्हटला की कधी अधून मधून कोसळणाऱ्या श्रावण धारा तर कधी लागोपाठ तीन-चार दिवस कोसळणारा आणि आसमंत चिंब करून टाकणारा धुव्वाधार पाऊस.
सर्व सृष्टी हिरवीगार झालेली असते. अशा नैसर्गिक अनुकूलतेने नटलेल्या या महिन्यात सर्वच प्रकारच्या देवी-देवतांची उपासना, आराधना, पूजा अर्चा आणि उपवास आपल्या वैदिक धर्मात केले जातात.
सर्वत्र वातावरण कसे प्रसन्न आणि धार्मिक असते.
अशाच भक्तिमय वातावरणाचा अनुभव रावेर तालुक्यातील ओंकारेश्वर येथे आज पहाटे अनुभवता आला.
आज ( ता ३१ ऑगस्ट ) श्रावणातील तिसरा सोमवार! पहाटे ठीक पावणे पाच वाजता रावेर तालुक्यातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर भोकरी देवस्थान येथे ७० वर्षांची परंपरा असलेल्या श्री महादेवाच्या काकड आरतीला उपस्थित राहण्याचा योग आला. दीर्घकाळ स्मरणात राहील अशी ही प्रसन्न पहाट होती.
श्रीक्षेत्र ओंकारेश्वर – प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. जळगाव जिल्ह्यासह नाशिकच्या पट्ट्याला पूर्वी दंडकारण्य म्हणत. प्रभू श्रीरामांच्या १४ वर्षांच्या वनवासातील सुमारे १३ वर्षांचा काळ याच दंडकारण्यात गेला.
अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आणि शेजारीच बाराही महिने वाहणारी भोकरी माई…. परिसरात ऋषीमुनींचे सानिध्य.. अशा ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रही काही काळ राहिले होते.
ओंकारेश्वर (भोकरी) येथील शिवलिंग त्याकाळी प्रभू श्रीराम यांनी त्यांच्या नित्यपूजेसाठी स्थापन केल्याची आख्यायिका आहे. मंदिराच्या पाठीमागील बाजूस रामबाण नावाने प्रसिद्ध असलेला जिवंत झरा आहे. ऋषीमुनींनी यज्ञ याग करून निर्माण झालेली ‘भस्मटेकडी’ शेजारीच आहे तर नदीकडील पाठीमागे सीतान्हाणी हे ठिकाण आहे. नंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
अशा या अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रात सुमारे ७० वर्षांपूर्वी रावेर शहरातील काही पहिलवान मंडळींनी श्रावणात येथे पायी येऊन पहाटे काकड आरतीचा नित्यनेम सुरू केला. १९५६ मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. हभप विश्वनाथ महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने संजय भोई, कैलास शिंदे, गणेश बारूदवाले, हिरामण बारी, विजय पाटील, विश्वनाथ बुवा भोई, शरद पाटील, राहुल अस्वार, यशवंत महाजन, प्रशांत महाजन, दत्तू चौधरी, मनोज पाटील इ मंडळी या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करतात. मंदिरातील मुकेश महाराज आणि पांडू महाराज अभिषेक आणि आरतीसाठी सहकार्य करतात. आज पहाटे ४ वाजताच महारुद्राभिषेक होऊन शिवशृंगार केला गेला. महादेवाचा गाभारा अतिशय आकर्षक आणि सुंदर फुलांनी सजविण्यात आला. ठीक ५ वाजता आरती सुरू झाली. आरतीसाठी गाभाऱ्यात फक्त सोवळे परिधान केलेल्यांनाच प्रवेश दिला गेला. बाकी सर्व युवक व भाविक बाहेरील सभागृहात शिस्तीत उभे होते. आरतीपूर्वी आलेल्या सर्वच भाविकांच्या कपाळावर गंध लावले गेले. प्रत्येक भाविकाला आरतीसाठी पणतीत तूपवात तयार करून दिली गेला. सुमारे पाऊण तास ही आरती चालली. पूर्वाभिमुख उजव्या सोंडेचा गणपती, शिवलिंग, श्री लक्ष्मीविष्णू, विठ्ठलरखुमाई, श्रीराम,लक्ष्मण, सीता, शत्रुघ्न, भरत, कार्तिक स्वामी आणि दत्तात्रय यांची आरती झाली. ढोल, नगारा, शंख, घंटा, झांज ज्यांच्या तालावर सर्व युवक आणि भाविक भक्तिमय वातावरणात आरती करत होते. आरती करतांना विद्युत दिवे बंद केले गेले त्यावेळी असंख्य आरतींच्या प्रकाशातील गाभाऱ्यातील आणि सभागृहातील दृश्य पाहून भान हरपून गेले.
आरती आटोपून प्रसाद घेतला. उपस्थित सर्व भाविकांना उपवासाची खिचडी आणि कॉफी देण्यात आली. सकाळी साडेसहाला घरी आलो. त्यानंतरचा संपूर्ण दिवस नेहमीपेक्षा अधिक प्रसन्न, उत्साही आणि ताजातवाना वाटत राहिला.
दर सोमवारची आरती वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्याची या पहिलवान मंडळींची परंपरा आहे. आज रावेरचे वन विभागाचे अधिकारी श्रीकांत काळे यांच्या हस्ते आरती झाली.
९ सप्टेंबरला या उपक्रमाचा समारोप आहे. त्या दिवशी दुपारी १२ वाजता महाआरती आणि महाप्रसाद (भंडारा) आयोजित केला आहे. दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.
आपणही या श्रावण महिन्याच्या पहाटे दररोज होणाऱ्या काकड आरतीत किमान एकदा तरी सहभागी व्हा… आणि ओंकारेश्वर येथील प्रसन्न पहाट कशी असते याचा नक्की अनुभव घ्या.
९ सप्टेंबरच्या भंडाऱ्याला प्रसाद घ्यायलाही या आणि तन-मन-धनाने शक्य ती मदत करून या पवित्र कार्यातही सहभागी व्हा.
सोबत – ओंकारेश्वर (भोकरी) येथील काकड आरतीची काही क्षणचित्रे.




