बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतकऱ्यांसाठी ‘पीक पुनर्वसन पॅकेज’ लागू करा ; डॉ रामप्रसाद शेळके यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील खरीप हंगामातील पिकांवर पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम होत असल्याने शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष ‘पीक पुनर्वसन पॅकेज’ जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. रामप्रसाद शेळके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.

सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांतील विविध गावांमध्ये पावसाचे प्रमाण व वितरण अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याने खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसात पडलेले खंड आणि पिकांना आवश्यक टप्प्यावर पाणी उपलब्ध न झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला पेरणी, बियाणे, खते, औषध फवारणी आणि मशागतीचा खर्च अडचणीत येण्याची शक्यता आहे.

परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी बाधित गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पीक नुकसानाचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेळके यांनी केली आहे. पर्जन्यमान, पिकांची अवस्था, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य नुकसान यांचा तालुकानिहाय आढावा घेऊन शासनाला अहवाल सादर करावा. शासनाच्या निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या भागात दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

नुकसानभरपाईपुरती मदत मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी उभे करण्यावर भर देण्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. प्रस्तावित पॅकेजमध्ये अनुदानित दरात बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठा देणे, सुलभ अटींवर कार्यकारी भांडवल उपलब्ध करून देणे, तसेच विहिरी, बोअरवेल, शेततळे व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची मागणी आहे. ठिबक आणि तुषार सिंचनासाठीही विशेष मदत देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पशुधनासाठी गावनिहाय चारा बँक उभारणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, बाधित शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी करून मदतीचे पारदर्शक वितरण करणे, तसेच आगामी रब्बी हंगामासाठी गावनिहाय पीक नियोजन व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना पीकविमा आणि नुकसानभरपाईचा लाभ मिळावा, तसेच कर्जमाफीच्या योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा विशेष बाब म्हणून विचार करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. नुकसानभरपाईसोबतच शेतकऱ्यांचे पुनर्वसन आणि पुढील हंगामाची तयारी या दोन्ही बाबींचा विचार करून शासनाने विशेष पॅकेज लागू करावे, अशी भूमिका डॉ. शेळके यांनी मांडली.

निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button