रायपूरच्या मतदार यादीत ‘अफगाणिस्तान, बिस्तर पर जाना, पुराना’,साकी,अंतरवासना,नावाचे मतदार…

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुखा: प्रतिनिधी
लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे – आ. श्वेता महाले पाटील
चिखली विधानसभा मतदारसंघातील रायपूर गावाच्या मतदार यादीत काही अत्यंत संशयास्पद आणि विचित्र स्वरूपाच्या नोंदी आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मतदार यादीत “मोहम्मद अफगाणिस्तान”, “बिस्तर पर जाना” आणि “पुराना”, तेलगू विकास खिलाडी,प्रोडक्ट का जाणकारी,साकी, अंतरवासना, अशा नावांच्या नोंदी दिसून आल्या आहेत.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या नावांच्या व्यक्ती गावात अस्तित्वात असल्याची माहिती कोणालाही नाही. त्यामुळे या नोंदींची तातडीने सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी केली आहे.
आ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, मतदार यादी ही भारतीय लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे त्यामधील प्रत्येक नाव सत्य, अचूक आणि पात्र नागरिकाचे असणे अत्यावश्यक आहे. जर मतदार यादीत चुकीच्या, बनावट किंवा संशयास्पद नोंदी राहिल्या, तर त्या लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करू शकतात. त्यामुळे अशा प्रत्येक प्रकरणाची निवडणूक आयोगाने निष्पक्ष व सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
त्यांनी सांगितले की, मतदार यादीतील अशा नोंदी आढळल्यास त्यावर केवळ चर्चा करून थांबणे पुरेसे नाही. नागरिकांनी आपल्या गावातील मतदार यादी काळजीपूर्वक तपासावी. एखादी नोंद संशयास्पद वाटल्यास त्याबाबत आवश्यक पुराव्यांसह निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा निवडणूक आयोगाकडे हरकत नोंदवावी. योग्य पडताळणी झाल्यानंतरच अशा नोंदींबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.
आ. महाले यांनी स्पष्ट केले की, भारतीय लोकशाहीमध्ये मताधिकार हा केवळ पात्र भारतीय नागरिकांचाच अधिकार आहे. त्यामुळे मतदार यादीतील प्रत्येक नावाची शहानिशा होणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या किंवा बनावट नोंदींना स्थान राहू नये, यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा.
रायपूर गावातील या प्रकरणाची संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि आवश्यक असल्यास दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही आ. श्वेता महाले पाटील यांनी केली आहे…✍️



