खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुबईसंपादकीयसामाजिक

१७ फेब्रुवारी १९३७ ला झाला

स्वतंत्र मजूर पक्षाचा अभूतपूर्व विजय

  १९३० , १९३१ व १९३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत भारतीयांना विशेष राजकीय अधिकार देण्याबाबत झालेल्या चर्चेअंती भारत अधिनियम कायदा १९३५ हा कायदा १९३५ मध्ये मंजूर करण्यात आला . या कायद्याला काँग्रेस , मुस्लिम लीग यांनी कडाडून विरोध केला . मात्र १९३७ मध्ये याच कायद्याच्या आधारे भारतातील सर्व १२ प्रांतांमध्ये निवडणुका घेण्याचे  इंग्रजांनी जाहीर केले तेंव्हा हेच काँग्रेस व मुस्लिम लीग  हे पक्ष निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्यात व जास्तीतजास्त जागा निवडून आणण्यात सर्वात पुढं राहिले . या काळात किमान ६० पक्ष अस्तित्वात होते . मुस्लिम लीग स्वतःला मुस्लिमांचा पक्ष मानत असला तरी सर्वातजास्त पक्ष मुस्लिमांचे होते .किमान १५ मुस्लिम पक्ष यात सक्रिय झाले . काही प्रमाणात त्यांचे प्रतिनिधी निवडून सुद्धा आले .
काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने ब्राम्हणांचा पक्ष होता व तो भांडवलदार , जमीनदार यांच्या हितासाठी लढत होता मात्र तो स्वतःला संपूर्ण हिंदूंचा पक्ष म्हणवून घेत होता .भारतातील बहुतांश हिंदू हे भावनिक पातळीवर काँगेस सोबत होती , त्यांना राजकीय हिताची , विचारधारेची , अधिकार , कर्तव्ये याची उमज  नव्हती .मात्र हिंदू धर्माच्या नावावर हिंदू महा सभा हा पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. हिंदूंचे सुद्धा काही पक्ष होते . अस्पृश्य समाज कोणत्याच पक्षाच्या अजेंड्यावर नव्हता व त्याचा स्वतंत्र कोणताच पक्ष नव्हता . संपूर्ण भारतभरात काँगेस पक्ष अत्यंत प्रभावशाली होता . राजकीय स्वातंत्र्या करिता राष्ट्रीय पातळीवर तो लढत होता तेंव्हा १९३७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक यश मिळेल हे निर्विवाद होते . हिंदूंच्या हिताचा पक्ष काँग्रेस तर मुस्लिमांच्या हिताचा पक्ष मुस्लिम लीग ही ओळख मात्र या पक्षांची देशभरात झालेली होती .

सध्याचे राजकीय वातावरण पाहता काँग्रेसला शह देणारा पक्ष नसल्याने देशात या पक्षाची हुकूमशाही निर्माण होऊ शकते , अस्पृश्य , कामगार , शेतकरी , महिला , बहुजन समाज यांना न्याय मिळवून देण्या करिता व स्वतंत्र विरोधी पक्ष निर्माण करण्या करिता एका नव्या पक्षाची आवश्यकता बाबासाहेबांना वाटली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ रोजी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात स्वतंत्र मजूर पक्षाची भूमिका प्रसिद्ध केली व याच दिवशी स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली . त्यांनी त्यांचे लक्ष मुंबई प्रांतावर केंद्रित केले. शेतकरी , शेतमजूर , कामगार , अस्पृश्य , महिला , बहुजन समाज यांची एकजूट करण्याचा , त्यांचेत १९३७ च्या निवडणुकीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला . स्वतंत्र मजूर पक्षाचे महत्व विषद करून याच पक्षाला आपण निवडून द्यावे असे वेळोवेळी आवाहन केले .
१९३७ मध्ये भारतातील संपूर्ण १२ प्रांतांतील एकूण १५८६ जागांकरीता निवडणूक जाहीर झाली . यात मुंबई प्रांतात एकूण १७५ जागां करिता ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी १९३७ रोजी मतदान घेण्यात येत असल्याचे जाहीर झाले . १७ फेब्रुवारी १९३७ ही निकालाची तारीख होती .
मुंबई प्रांताच्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्ष , काँग्रेस , मुस्लिम लीग , ब्राम्हणेतर पक्ष , लोकशाही स्वराज्य पक्ष , खोटी सभा , काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष , हिंदू महासभा व अन्य काही पक्ष पूर्ण ताकदीने उतरली . यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे १५ उमेदवार उभे केले . बाबासाहेबांच्या या भूमिकेने मुंबई प्रांताचे राजकीय ध्रुवीकरण झाले , काँग्रस पक्षाला आपली रणनीती ठरविताना मोठी कसरत करावी लागली . असे असले तरी आपणच सत्तेवर येऊ असे याचा आत्मविश्वास काँग्रेसला होता . सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसने बाबासाहेबांचे चरित्र हनन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला .
आपल्या उमेदवारांच्या प्रचारा करिता बाबासाहेबांनी अतिशय मेहनत घेतली . जिथं जिथं उमेदवार उभे केले होते त्या प्रत्येक मतदारसंघात त्यांनी प्रचार सभा घेतल्या . स्वतः बाबासाहेब मुंबई ( भायखळा ) येथून निवडणुकीला उभे राहिले. मतपत्रिकेतील त्यांचा अनुक्रम क्रमांक ३ होता व निवडणूक चिन्ह माणूस होते . या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध क्रिकेटपटू बाळू बाबाजी पालवणकर यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुध्द उभे केले . पांडुरंग नथुजी राजभोज , बाळकृष्ण देवरुखकर , जिणाभाई जोशी , केशव जोगळेकर , मंचरशा गिल्डर हे अन्य उमेदवार होते . मतांची विभागणी करण्याकरिता राजभोज व देवरुखकर यांना काँग्रेसने अंतर्गत मदत केली . मात्र अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत बाबासाहेबांचा विजय झाला .
दिनांक १७ फेब्रुवारी १९३७ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाला घवघवीत यश मिळाले . त्यांचे १३ उमेदवार निवडून आले. काँग्रेस ८५ , मुस्लिम लीग १८ , ब्राम्हणेतर पक्ष १० अपक्ष ४९ जागांवर विजयी झाले . स्वतंत्र मजूर पक्षाच्या या अभूतपूर्व यशाने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले . इतरांच्या मदतीने त्यांना सरकार बनवावे लागले . मुंबई प्रांतात निवडून आलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या आमदारांची संख्या लक्षात घेता राज्यपाल नियुक्त सभासदांमध्ये पुरुषोत्तम सोलंकी व एस. जी. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली .
अत्यंत कमी कालावधीत एवढ्या मोठ्यासंख्येने उमेदवार निवडून आणून बाबासाहेबांनी नवा इतिहास रचला . बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत वेळोवेळी मांडलेल्या भूमिकेतून भारतभरात अस्पृश्य समाजाच्या वाट्याला १५१ जागा आल्या . वेगवेगळ्या प्रांतात अस्पृश्य समाज प्रथमच आमदार झाला तो भलेही वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आला असेल पण तो बाबासाहेबांच्या व स्वतंत्र मजूर पक्षाच्या विचारधारेतून , संघर्षातून आमदार झाला तेंव्हा त्यांचे यश हे स्वतंत्र मजूर पक्षाचेच यश आहे असे म्हटले तर संयुक्तिकच ठरेल . हजारो वर्षाच्या गुलामगिरी नंतर या भारतात प्रथमच १५१ अस्पृश्य आमदार झाले ही क्रांती बाबासाहेबांमुळे झाली . काँगेस तर गोलमेज परिषदे बाबत उदासीन होती , काही प्रसंगी तिने यावर बहिष्कार टाकला तर ज्या कायद्याच्या आधारे त्यांचे भारतभरात ७०६ आमदार झाले त्या कायद्याच्या विरोधात त्यांनी आग्रही भूमिका घेतली .
लेखक ……जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी
अजिंठा चौक जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button