अवैद्य दारू विक्रेत्यांवर एकाच तारखेत चार ठिकाणी तेल्हारा पोलिसांचे छापे! महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये आरोपींवर गुन्हे दाखल! हजारोचा मुद्देमाल जप्त!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा ता. २६ : हल्ली तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध आणि विनापरवाना देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्रीसुरू असून या विरोधात तेल्हारा पोलिसांनी एकाच तारखेत चार ठिकाणी छापे मारी करत हजारोंचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली. अटकळी फाटा, तेल्हारा शहर, घोडेगाव आणि दहिगाव येथे करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण १६ हजार ६०० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस कॉन्स्टेबल बळीराम तारे आणि जीपीएसआय नंदू सुलताने गस्तीवर असताना त्यांना अटकळी फाटा परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार राहुल हिम्मत वानखडे (वय ४०, रा. मनब्दा) याच्यावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपीकडून ४१ क्वॉर्टर देशी दारू जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत सुमारे ४ हजार १०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी कारवाई तेल्हारा शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर गिरी यांच्या पथकाने छापा टाकून केली. यावेळी श्याम लक्ष्मण पिंपळकार (वय ५३, रा. साईनगर, तेल्हारा) याच्या ताब्यातून ५१ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत अंदाजे ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तिसऱ्या कारवाईत घोडेगाव येथे पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन ठाकूर आणि हेड कॉन्स्टेबल राहुल तायडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एका घरावर छापा टाकण्यात आला. आरोपीने खताच्या पोत्यात दारू लपवून ठेवली होती. पोलिसांनी तपासणी केली असता ४९ क्वॉर्टर देशी दारू आढळून आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ४ हजार ९०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. चौथ्या कारवाईत दहिगाव येथे पोलिस कॉन्स्टेबल अतुल साबळे आणि हेड कॉन्स्टेबल विनोद इंगळे यांनी सुरेश नागदेव इंगळे (वय ५५) याच्या घराच्या अंगणात छापा टाकला आरोपीच्या ताब्यातील पिशवीतून ५० नग देशी दारूचे क्वॉर्टर जप्त करण्यात आले.
या कारवाईत २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. विविध प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलिस अधिकारी करत आहे. यापुढेही अवैद्य धंद्याविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले.



