रिसोड-मालेगाव मतदारसंघात रंगणार ‘त्रिकूट’ संघर्ष: युतीधर्म पाळला जाणार का?

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – रिसोड-मालेगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव चांगलाच तापलेला आहे जवळपास दोनशे गावांचा हा मोठा मतदारसंघ असून,मतदारांच्या विकासाच्या आश्वासनांचा मागील अनेक वर्षांपासूनच विचार न केल्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे परंतु, आता एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचे आव्हान युतीसमोर उभे आहे,ज्यामुळे येथे “युतीधर्म” पाळला जाणार का,याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
भावनाताई गवळींच्या महायुती प्रवेशाने रंगली लढत…
वाशिम जिल्ह्याचे शिल्पकार असलेले खासदार पुंडलिकराव गवळी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याची निर्मिती झाली,आणि त्यांच्या कन्या भावनाताई गवळी,यांना महायुतीकडून धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी योजना,घर वापसी योजनेच्या माध्यमातून १९९९ ची पुनरावृत्ती होईल का,अशी शक्यता मतदारसंघात व्यक्त केली जात आहे त्यांच्या नेतृत्वात मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून त्यांचे कार्यकर्तृत्व मतदारांमध्ये प्रभाव टाकणारे आहे.
अनंतराव देशमुखांचा दबदबा कायम…
माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मतदारसंघात अनेक विकासकामे आणली त्यांची मुंबई व दिल्लीतील प्रशासनाशी असलेली जवळीक त्यांना निवडणुकीत आघाडी मिळवून देण्याची शक्यता वर्तवते त्यांच्या नेतृत्वातील कार्यकर्त्यांचा एक मजबूत गट तयार असून,त्रिकूट लढतीमुळे त्यांना बळ मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
अमित झनक यांचा “काँग्रेसचा बालकिल्ला”…
काँग्रेसचा हा मतदारसंघ असून, आमदार अमित झनक यांनी सत्ता नसतानाही मोठ्या विकास कामांमध्ये यश मिळवले मात्र,मतदारसंघात होत असलेल्या बदलांमुळे त्यांच्या आशीर्वादाची गणिते धोक्यात येऊ शकतात,असे मतही काहींनी मांडले आहे.
मतदारसंघातील जात-धर्म समीकरणे निर्णायक…
मतदारसंघातील जात आणि धर्माच्या समीकरणांचा प्रभाव नेहमीच निर्णायक ठरला आहे यंदाच्या निवडणुकीत अनंतराव देशमुख, भावनाताई गवळी,आणि अमित झनक या तिघांमध्ये रंगणाऱ्या या संघर्षात कोण बाजी मारणार, कोणाला फायदा मिळणार,आणि युतीधर्म पाळला जाणार का,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रिसोड-मालेगावच्या नागरिकांनी त्यांच्या अपेक्षांचे ओझे या तीन दिग्गज नेत्यांच्या खांद्यावर टाकले आहे,आणि त्यातून कोणत्या पक्षाला विजय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



