मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यांसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती; शेतकऱ्यांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी
मुक्ताईनगर : मागील सुमारे एक ते दीड महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यांसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, नुकसानभरपाई, पीकविमा लाभ व दुष्काळी सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे. यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी, बियाणे, खते, औषधे, मशागत व इतर शेतीकामांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे; मात्र पावसाअभावी ही संपूर्ण गुंतवणूक धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.
मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यांसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा शासनाने तातडीने आढावा घ्यावा व जिल्हा दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत. पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई, पीकविमा लाभ, दुष्काळी सवलती तसेच आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
दुष्काळी परिस्थितीचा शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून तातडीने निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा, अशी नम्र विनंती आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



