विचार वादळ YOUTUBE CHANNEL चे संपादक मा. काशिनाथ तिवरे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा शहापूर कडून सन्मानित..!!!

देशाची अखंडता, लोकशाही मूल्ये व संविधान यांस धोकादायक परिस्थिती निर्माण करण्याचे काम *मतांध-जात्यांध-धर्मांध* शक्तींकडून गेल्या काही वर्षांत सुरू आहे.
*देव-देश-धर्म* या त्रिसूत्रीचा बागुलबुवा व भूलभुलैया निर्माण करुन या *नकली* देव-देश-धर्म प्रेमी(?) व्यवस्थेकडून राजकीय ईप्सित साध्य केले जाते व सत्ता हातात येताच *स्वदेवी-स्वदेशी-स्वधर्मी इतकंच काय तर स्वपक्षीय समर्थकांचेही जीवन दुष्कर करण्याचे कारस्थान राबवले जाते.*
रोजगार, महागाई, भ्रष्टाचार, खाजगीकरण,भांडवलीकरण, तुष्टीकरण या मुद्द्यांपासून जनतेचे/तरूणवर्गाचे लक्ष भरकटवण्यासाठी धार्मिक वा तत्सम मुद्द्यांचे नियोजनबद्धरित्या मार्केटिंग केले जाते.आभासी धर्म-देशप्रेम निर्माण करून मते काबीज केली जातात. मिडिया मॅनेज करणे, वृत्तवाहिन्या ताब्यात घेणे,सोशल मिडियावर बेरोजगारांची पगारी फौज राबवणे, साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून विचार स्वातंत्र्याची गळचेपी करणे, एकंदरीत संविधानिक हक्क -अधिकारांची राजरोस पायमल्ली करून एक हुकूमशाही वातावरण तयार करण्याचे काम सुरू आहे.असे प्रचंड दूषित सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक वातावरण असतानाही मात्र समाजातील काही निर्भीड, तत्वनिष्ठ, लोकशाहीवादी पत्रकार कोणत्याही परिणामांची पर्वा न करता लोकांना जागृत करण्याचे काम व समाजासमोर सत्य मांडण्याची भूमिका घेतात व लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मिडिया वरचा विश्वास दृढ करण्याचे कार्य करत असतात.
२३ फेब्रुवारीला विचार वादळचे संपादक मा.काशिनाथजी तिवरे आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला या सर्व धोकादायक बाबींची जाणीव करून देणारे बहुमूल्य असे उद्बोधनाचे काम केले गेले.समाजाला वास्तवाची जाण करून दिली.
समाज जागृतीसाठी मा.तिवरे यांनी केलेल्या या धाडशी व उल्लेखनीय प्रयत्नासाठी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा शहापूरच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले व समाजाप्रती त्यांच्या मनात असलेल्या कणवेबद्दल शाखेकडून कृतज्ञता व्यक्त केली गेली.लोकशाही मूल्यांची जपणूक व संवर्धन करणाऱ्या प्रत्येक सच्च्या/प्रामाणिक देव-देश-धर्म प्रेमी व्यक्ती सोबत शहापूर शाखा खंबीरपणे असेल मग ती व्यक्ती कोणत्याही जात, धर्म,पंथ वा पक्षाचीही का असेना अशी ग्वाही देण्यात आली.
मा.तिवरे यांच्याकडून शहापूर शाखेस संविधान प्रास्ताविकेची प्रतिमा भेट देण्यात आली.
*कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई*
@शाखा तालुका शहापूर@



