भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची ड्युटीवर निर्घृण हत्या; संशयिताला तात्काळ अटक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
भुसावळ – शहरातील कवाडे नगर परिसरात शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रेल्वेच्या फिल्टर हाऊसमध्ये ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) हे फिल्टर हाऊस येथे ड्युटीवर असताना आरोपी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर, भुसावळ) याने कोणतेही स्पष्ट कारण नसताना त्यांच्या डोक्यावर लोखंडी पट्टीने वार केला. या हल्ल्यात कुलकर्णी गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले तसेच शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक महेश गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी आकाश गोरखा याला ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी मनोरुग्ण असून त्याच्यावर ठाणे येथे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या बाबीची अधिकृत पडताळणी अद्याप सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल होते. मात्र २०२१ पासून आजपर्यंत त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा नवीन गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. या घटनेमुळे भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



