जळगावा जिल्हाभुसावळ

भुसावळमधील कायदा व सुव्यवस्थेवरून आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न

मुंबई: भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात पान स्टॉल चालकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते , या प्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषद सभागृहात तारांकित प्रश्नाद्वारे केली. शहरातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत खडसे यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले, ज्यावर गृहविभागाच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर सादर केले

​आमदार एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात माहिती दिली की, १७ डिसेंबर २०२५ रोजी भुसावळ येथील जळगाव नाका परिसरात एका पान स्टॉल चालकावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना निर्माण झाली आहे. या गंभीर घटनेचा तपास करण्यास आणि आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यास पोलीस प्रशासनाकडून विलंब झाला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नेमक्या कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, याची विचारणाही त्यांनी केली.

​या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, १७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मित्र पान स्टॉलवर उभे असताना चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना पिस्तुलचा धाक दाखवून दागिने आणि पैसे काढून देण्यास सांगितले. फिर्यादीने विरोध केला असता झटापट झाली आणि आरोपींनी गोळी झाडली, ज्यामध्ये फिर्यादी जखमी झाले. या प्रकरणी १८ डिसेंबर २०२५ रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे BNS कलम ३११, ३१२ सह आर्म ॲक्ट ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण ४ विधी संघर्ष बालकांचा (Minor) सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी ३ विधी संघर्ष बालकांना १८ डिसेंबर रोजीच ताब्यात घेऊन बालसुधार गृहात ठेवण्यात आले होते, मात्र सध्या बाल न्याय मंडळाने त्यांची मुक्तता केली आहे. उर्वरित एका आरोपीचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत.
​शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत गस्त वाढवण्यात आली आहे. ‘डायल ११२’, ‘दामिनी पथक’ आणि ‘बीट पेट्रोलिंग’च्या माध्यमातून तातडीने पोलीस मदत पुरवली जात आहे. विशेष म्हणजे, शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सन २०२४ पासून फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत MPDA (एमपीडीए) अंतर्गत ६ कारवाया, तसेच मपोका कलम ५५ अन्वये २, कलम ५६ अन्वये ४४ आणि कलम ५७ अन्वये २ अशा प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
​आमदार एकनाथराव खडसे यांनी हा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केल्याने भुसावळमधील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाकडून आता गुन्हेगारांविरुद्ध काय पावले उचलली जातात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button