दसरा व नवदुर्गा विसर्जन शांततेत पार पडावा यासाठी चिखली पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक पार

प्रतिनिधी चिखली अरुणा खंडागळे
सोमवार रोजी चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीतील आगामी दसरा व नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीसंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे अध्यक्षतेखाली शांतता समितीचे सदस्य, नवदुर्गा उत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत येणाऱ्या सणांमध्ये शांतता व सलोखा राखत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा पाळणे, वाहतुकीस अडथळा न होऊ देणे, वेळेचे पालन करणे यावर विशेष भर देण्यात आला.
तसेच, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 29 सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सदर बैठकीत नागरिकांना माहिती अधिकार कायद्याची सविस्तर माहिती देण्यात आली. हा कायदा प्रत्येक नागरिकाला प्रशासनातील पारदर्शकतेचा व उत्तरदायित्वाचा अधिकार देतो, याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
बैठकीस सुधीर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा, संतोष काकडे, तहसीलदार चिखली, चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी,पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिंदे तसेच विविध गावांतील पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते. शांतता समितीच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्वांनी प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.



