जळगावा जिल्हाराजकीयसंपादकीयसामाजिक

मंत्री वढाय वढाय,उभ्या पिकामधलं ढोर !हाकला हाकला त्याले,फिरी येतं सत्तेवर !!

मन वढाय वढाय,उभ्या पिकामधले ढोर!
किती हाकला त्याले,फिरी येते पिकावर!!
जळगाव च्या कवीयत्री बहिणाबाई चौधरी यांनी सत्तर वर्षा,पुर्वी ही कविता जळगाव जिल्ह्यातील असोदा गावाच्या शेतात केली होती.ती आता गुलाबराव ,अजितदादा यांना तंतोतंत लागू होते.फरक इतकाच कि,त्यांनी ढोराचे वर्तन पाहून म्हटले होते.पण आता आम्ही पोरांचे वर्तन पाहून म्हणतो.जे जे न देखे रवी ते ते देखे कवी.याची प्रचिती आली.या आजीबाईंना आपल्या चष्म्यातून इतके दूरचे दिसले,जे कल्पनेपलिकडचे आहे.याला अंतर्चक्षूंची गरज असते.शिक्षणाची नाही.कवियित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना कितीही शिक्षण दिले,कितीही पगार दिला तरीही बहिणाबाईंची दूरदृष्टी येणार नाही.त्यांचे शिक्षण नोकरीसाठी आहे. पगारासाठी आहे.
जनतेने आमदार निवडून दिला.मंत्री झाला.कारभारी केला.जनतेच्या कराचा पैसा ज्वारीच्या ताट्यासारखा खाल्ला.अर्धा खाल्ला,अर्धा पायदळी तुडवला.जनतेला राग आला.जनतेने हाकलून दिला.संधी मिळताच पुन्हा सत्तेत शिरलाच.इकडून हाकलला तर तिकडून शिरला.जर त्या ढोराने म्हटले कि,मी ज्वारी पिकाच्या कल्याणासाठी, विकासासाठी शेतात शिरलो, तर त्या शेतकऱ्याला कसे पटेल?
अजितदादांनी एकतर आधीच भाजप बरोबर युती करून फडणवीस यांच्या शेतात प्रवेश केला.सत्तर हजार कोटी धाटे खाल्याची क्लिनचीट मिळवून घेतली.लिहून घेतले,इतकी धाटे शेतात उगलीच नव्हती.तर खाण्याचा प्रश्न येतो कुठे?तिकडून काकांनी हाकलले.नंतर सेना कांग्रेस च्या शेतात शिरले.अडीच वर्षं शेत चेंगरून काढले.तेथून उलगवाणी झाल्यानंतर एक वर्ष चूप बसले.काकांचे थोढे दुर्लक्ष होतात पुन्हा शिंदे यांच्या शेतात शिरले.तीन वर्षात एकदा नव्हे दोनदा तिनदा.
शेतात पीक उभे असते तेंव्हा शेतकरी काठी धरून उभा असतो.ढोर आले कि, बाहेर हाकलतो.ते पुन्हा येते.शेतकरी पुन्हा हाकलतो.हा त्रास कमी होत नाही.जो पर्यंत धरून कोंडवाड्यात कोडून ठेवत नाहीत.भुजबळ तर आताच कोंडवाड्यातून बाहेर आले.पुन्हा शेतात शिरले.बाकी तर कुंपणावर बसून आहेत.संधी मिळताच शेतात शिरतील.अशी अनेक ढोरं ,पोरं महाराष्ट्रातील राजकारणात आहेत.कोंडले तर कोढवाड्यात जागा कमी पडेल.म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या ढोरांना ,पोरांना दंड करून स्वताच्या दावणीला बांधून घेतात. जनावरे जप्त करून घेतात..
जंगलात जसा जनावरांचा कळप असतो,तसा राजकारणात चोरांचा कळप असतो.त्याला राजकीय भाषेत पक्ष म्हणतात.आपल्या कळपातील चोराला चोरीची संधी मिळाली कि,त्या कळपातील जनावरे हिंदळतात,कुदळतात.तशी काल महाराष्ट्रातील काही पोरं नाचली.आपल्या कळपातील जनावर चोर मार्गाने शेतात शिरले तर या पोरांना चुकीचे वाटले नाही.हे चुकले,असे म्हटले नाही.तर मग ही पोरं आहेत कि ढोरं?याचा अभ्यास अमळनेर च्या प्रताप कॉलेज मधे केला गेला पाहिजे.जळगांव,पुणे,परभणी, मुंबई च्या विद्यापीठातून केला गेला पाहिजे.
महाराष्ट्र भुमी जनतेची आहे.कर जनतेचा असतो.जनताच मालक आहे,राज्याचा आणि तिजोरीचा.आणि जर असे कोणी गैरमार्गाने तिजोरी वर डल्ला मारत असेल तर जनतेने सावध मालकाची भुमिका घेतली पाहिजे.आपण निवडून दिलेली माणसे मंत्री बनून तिजोरी लुटतात.आपण उघड्या डोळ्यांनी पाहातो. पेपरला वाचून, टिव्ही ला पाहून स्वताच्या कानफटात मारून घेतो.ही अवस्था चांगली नाही.उद्वेग आणणारी आहे.चीड आणणारी आहे. संताप आणणारी आहे.
यावर मालकाकडे उपाय आहे.सर्वात सोपा उपाय! रामबाण उपाय!निवडणुक.मतदान.असे जनावरांसारखे,ढोरांसारखे वर्तन करणाऱ्या माणसांना निवडून देऊ नये.लोकशाहीला ७३वर्षे झालीत.तीन पिढ्या खपल्यात.तरीही आपण अजून चांगले वाईट पारखू शकलो नाहीत.हे सुद्धा निर्बुद्ध पणाचे लक्षण आहे.तर मग,आपण लोकशाही राबवण्यास पात्र नाहीत.याचा गैरफायदा राजकीय चोर मंडळी घेते.आपण राबतो.कष्ट करतो.कर भरतो.तिजोरी भरतो.आणि चोर लुटून नेतो.काय उपयोग राबण्याचा ,कष्टाचा?हे बदलण्याची खूप गरज आहे.हे बदलणे कठीण नाही.त्यासाठी आपण बहिणाबाईंच्या भुमिकेत आले पाहिजे.जे आजीबाईला शेतात निंदतांना कळले ते आम्हाला गावात, शहरात राहून कळत नसेल का?
फक्त जळगाव नव्हे, महाराष्ट्रात अनेक चोर,दारू विकणारे, रेतीमाफिया, डान्सबार वाले, सट्टावाले,चाकू सुरी पिस्तूल वाले राजकारणात धुमाकूळ घालत आहेत.चोरीचा पैसा देऊन मत खरेदी करून निवडून येत आहेत.आणि आम्ही अजून फक्त रडत आहोत.रस्ता उखडला रे!गटार तुंबली रे!वीज गेली रे!पाणी आटले रे!औषधी चोरली रे!
यावर आम्ही जनतेला जागृत करीत आहोत.तोंडावर पाणी मारत आहोत.डोक्याला खटखट करीत आहोत.उठ!झोपलास कि निपचित पडलास? तुझ्या कष्टाची कमाई मामा,भाऊ,दादा,बापू,आप्पा खाऊन गेला.तरीही तू त्याच्या गळ्यात माळा घालतोस!हाच आमचा तारणहार म्हणतोस!ही ग्लानी आहे.हे औदासिन्य आहे.अशी स्थिती येते अधूनमधून.महाभारतात हेच तर वर्णन केले आहे.शिवपुर्वकाळात हेच तर वर्णन केले आहे.इंग्रज अमदानित हेच तर वर्णन केले आहे.तिच स्थिती आज जळगाव ची आहे.तिच स्थिती महाराष्ट्राची आहे.
अधर्माचे निर्दालन करण्यासाठी पुरूष जागा होत असतो.आता आपल्या आतील पुरूष जागा झाला पाहिजे

शिवराम पाटील
महाराष्ट्र जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button