१ सप्टेंबरपासून रुग्णवाहिकाचालकांचे काम बंद आंदोलन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ चालक संघटनेने विविध मागण्यांसाठी दि. १ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलनासह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात आपत्कालीन मोफत १०८ रुग्णवाहिका सेवा सन २०१४ पासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेला नऊ वर्षे झाली असून, अद्यापही या रुग्णवाहिका चालकांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. याबाबत रुग्णवाहिका चालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. सावंत यांनी बीव्हीजी कंपनीचे संचालक आणि इतर अधिकाऱ्यांशी बैठक
घेऊन चर्चा केली. त्यावेळी संबंधितांकडून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, एक महिना उलटूनही कंपनीने चालकांच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला नाही. तसेच चर्चेसाठी निवेदन दिले असता तेही मान्य करण्यात आले नाही, असे संघटनेने म्हटले आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत या योजनेतील चालकांना ८ तासाला ३० हजार, तर १२ तासाला ३८ हजार रुपये मिळतात. मात्र, महाराष्ट्रात १२ तास काम करून केवळ १५. ते १९ हजार मिळतात, असे संघटनेने म्हटले असून, समान काम आणि समान वेतन देण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास १ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.



