बुलढाणामहाराष्ट्र

संस्कार ही मानवी जीवनाची गरज-ज्ञानेश्वर महाराज वाघ

(वार्ताहर-महेंद्र कराळे)
अगदी काल परवा पर्यंत घेणाऱ्या आणि देणाऱ्या अर्थातच बालक आणि त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिजे तेवढ्या प्रमाणात जागरूकता व उत्सुकताही नव्हती . आज मात्र शैक्षणिक क्षेत्रात जागृती व प्रगती सुद्धा भरपूर प्रमाणात झालेली आहे. म्हणूनच शिक्षण ही काळाची गरज आहे असे वाक्य अनेकांच्या मुखातून ऐकण्या करीता मिळतात आणि ते सत्यही आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिक्षण ही काळाची तर ; संस्कार ही मानवी जीवनाची गरज आहे.
‌ संस्काराच्या भरभक्कम पायावर उभारलेली जगाच्या पाठीवर एकमेव संस्कृती जर कोणती असेल तर , ती फक्त आणि फक्त भारतीय संस्कृतीच आहे . ती टिकून ठेवण्यासाठी बाल संस्कार अत्यावश्यक आहेत . जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी भाषेचा अभ्यास असणे जितके गरजेचे आहे तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात संस्कृती टिकण्यासाठी संस्कृत भाषेचा अभ्यास असणेही आवश्यक आहे. कारण संस्कृतीचे सर्व तत्त्वज्ञान हे संस्कृत भाषेत शब्दबद्ध करून धर्मग्रंथांमध्ये संग्रहित करण्यात आलेले आहे.भारतीय संस्कृती ही प्रगतीला विरोध करणारी नाही. परंतु स्वातंत्र्याचा केवळ स्वैराचार एवढाच अर्थ सद्यस्थितीमध्ये केल्या जात आहे . आणि त्याचे दुष्परिणाम कुटुंब व्यवस्था उध्वस्त होण्यामध्ये होत आहे . म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या बालकांना देशभाषा ( मातृभाषा ) , वेशभूषा ( भारतीय पोशाख ), खानपान ( शुद्ध शाकाहारी भोजन ) आणि देह संबंध ( वैवाहिक जीवन ) या चतु:सूत्रीचे तरी निदान योग्य ते मार्गदर्शन करून ; त्याची सक्तीने अंमलबजावणी त्यांच्याकडून करून घ्यावी . तरच आणि तरच आपल्या पूर्वजांनी जिवापाड प्रेम करून जपलेली सर्वोत्कृष्ट , सर्वसमावेशक , सर्वहितकारी , सर्वानुकरणीय , निश्चितफलदायनी स्वरूपाची सुलभ संस्कृती आणि अनादी परंपरा टिकतील अन्यथा नाही.
आज आम्ही पाश्चात्यांचे अंधानुकरण करून जन्माचे व लग्नाचे वाढदिवस साजरे करायला लागलो . परंतु माता- पित्याची तेरवी मात्र विसरलो .
आज जर आम्ही तेरवी मोडीत काढली आमचे पुढची पिढी आमच्यापेक्षा पुढारलेली असेल आणि ते आमचा अंत्यसंस्कार मोडीत काढण्याकरिता मागे पुढे पाहणार नाहीत. तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी गोठ्यातील जनावर मेल्यानंतर ते जसे गावाच्या बाहेर ओढत नेऊन फेकून दिल्या जातात त्याच प्रमाणे घरातील वृद्ध मृत व्यक्तींना नेऊन टाकल्या जाईल . हा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्वजांनी चालू केलेल्या आणि जोपासलेल्या विज्ञाननिष्ठ परंपरा आपण सुद्धा सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून जोपासल्या पाहिजेत . मानवी जीवनात बऱ्याच गोष्टी आपण मान्यतेवर जगत असतो परंतु परंपरा जोपासतांना मात्र वास्तववादाचा पुरस्कार करतो. हे दुटप्पी धोरण संस्कृतीच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे.
आज ” हम दो हमारे दो l दादा दादी निकाल दो ll” हाच अघोषित नियम घरोघरी लागू होत असल्यामुळे ; संस्काराचे चालते बोलते विद्यापीठ असणारे आजी – आजोबा वृद्धाश्रमात मरण येत नाही म्हणून जिवंत असून, अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. ही संस्कृतीच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज कुत्रे वागविणे हे प्रतिष्ठेचे आणि माय बापाला सांभाळणे हे नामुष्कीचे समजल्या जाते . बंगल्यामध्ये चार चाकी गाडी व कुत्र्या करीता जागा राखीव आहे. परंतु स्वमाता व गोमाते करता मात्र नाही.आज विवाह सुद्धा विधी न राहता तो एक करार झालेला आहे . अर्थात घटस्फोटाचा पर्याय हातचा राखूनच नोंदणी विवाह केल्या जातो आहे वैदिक पद्धतीचा नाही. परिणामी घटस्फोटाच्या प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . अर्ध्यावरती संसार मोडल्यामुळे व्यसनाधीन तरुणांची व अनाथ मुलांची संख्या भरपूर प्रमाणात वाढत आहे . या संपूर्ण विकृती आणि विध्वंसाला केवळ संस्काराचा अभाव हीच गोष्ट कारणीभूत आहे. स्त्रीभ्रूणहत्येला वेळीच आळा न घातल्यामुळे आज मुला-मुलीतील संख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत निर्माण होऊन ; परिणामी अनेक मुलांना लग्न करीता मुली मिळत नाहीत. बरेच मुल लग्न करीता जातीची मुलगी नाही तर , फक्त मुलीची जात तरी मिळेल या भाबड्या आशेने कित्येक दिवस झाले फिरतांना दिसत आहेत. किंबहुना ” मिली तो मिली न ही तो ब्रह्मचारी ” असे म्हणुन मानसिक संतुलन बिघडलेले कित्येक तरुण आपल्या अवतीभवती वावरत असणाऱ्यांची संख्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाढत चालली आहे . हे वास्तव आणि विदारक चित्र समाजामध्ये दिसून येत आहे. आता जर संस्कृती रक्षणाकडे दुर्लक्ष जर केले तर , कुटुंब व्यवस्था पूर्णतः उध्वस्त होण्याकरिता वेळ लागणार नाही. म्हणून याला वेळीच आवर घालण्याकरिता संस्कृती रक्षण व संस्कार संवर्धना साठी सामूहिक प्रयत्न करून , फार मोठी सामाजिक चळवळ उभी करणे नितांत गरजेचे आहे.
श्री ज्ञानेश्वरदासानुदास
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button