मुक्ताईनगरात दुभाजकाच्या कामात सुरक्षेचा अभाव?; रस्त्यावर चिखल साचल्याने अपघातांचा धोका वाढला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरात सुरू असलेल्या दुभाजक (डिव्हायडर) बांधकामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. खोदकामानंतर निघणारी माती रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यावरच टाकली जात असल्याने पावसाळ्यात त्या ठिकाणी चिखल तयार होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे ब्रेक योग्य प्रकारे लागत नाहीत. परिणामी, वाहन घसरून अपघात होण्याच्या घटना घडत असून भविष्यात एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच, काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेसे बॅरिकेड्स, इशारा फलक, रिफ्लेक्टर किंवा रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था नसल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराकडून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी तसेच आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.



