शिक्षकांचा शिक्षणासाठी लढा; आज राज्यभर शाळा बंद, जिल्हाधिकारी कार्यालयांवर महामोर्चा….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा:- ९ जुलै २०२६
विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या’च्या घोषणेसह जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींना सहभागाचे आवाहन. राज्यातील शिक्षकांवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ आज, ९ जुलै २०२६ रोजी राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांतील हजारो शिक्षक सहभागी होत असून जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त जनगणना, BLO कामे, मतदार यादी, विविध सर्वेक्षणे, ऑनलाइन डेटा भरणे, अहवाल तयार करणे, ॲप व लिंकद्वारे माहिती अपलोड करणे अशा अनेक कामांमध्ये गुंतवले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आंदोलनाचा प्रमुख संदेश “विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या” असा असून, शिक्षण व्यवस्थेला पूर्ववत करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांनी सांगितले की, शिक्षणाचा दर्जा उंचावायचा असेल तर शिक्षकांना केवळ अध्यापनाची जबाबदारी द्यावी आणि अनावश्यक प्रशासकीय कामांपासून मुक्त करावे.
मुख्य मागण्या…..
TET संदर्भातील धोरणाचा पुनर्विचार करावा.
शिक्षकांकडून घेतली जाणारी BLO कामे बंद करावीत.
सर्व अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढून घ्यावीत.
ऑनलाइन कामे, ॲप आणि लिंकद्वारे होणारा अतिरिक्त ताण कमी करावा.
शिक्षक संघटनांनी शिक्षकांसह पालक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि सामाजिक संघटनांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून निवेदन देण्यात येणार आले आहे. शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, शिक्षणाचा पाया मजबूत करायचा असेल तर शिक्षकांना कागदोपत्री कामातून मुक्त करून वर्गात विद्यार्थ्यांसोबत अधिक वेळ देण्याची संधी मिळाली पाहिजे. शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे…..✍️



