पीक कर्ज कधी मिळणार? शेतकरी प्रतीक्षेत

कर्जमाफी झाली; मात्र नव्या पीक कर्जासाठी प्रतीक्षा, सप्टेंबर अखेर आला तरी संभ्रम कायम
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : सप्टेंबर अखेर आला असताना खरीप हंगामातील पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून कर्जवाटपाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. कर्जमाफीची प्रक्रिया झाल्यानंतरही नव्या हंगामासाठी पीक कर्ज मिळण्यास विलंब होत असल्याची भावना काही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
पेरणी, खते, बियाणे आणि पीक व्यवस्थापनासाठी झालेला खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची गरज आहे. वेळेत पीक कर्ज उपलब्ध न झाल्यास शेतीच्या पुढील खर्चाचे नियोजन करणे अडचणीचे ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे पाठपुरावा करीत आहेत.
तालुक्यातील यंदाचे पीक कर्ज उद्दिष्ट, आतापर्यंत झालेले कर्जवाटप आणि प्रलंबित अर्ज याबाबत स्पष्ट माहिती समोर येणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रशासनाने बँकांच्या कर्जवाटपाचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.



