हक्क लुटले जातात तेव्हा गप्प, आणि मत विकताना छातीठोक अभिमान ही गुलामी नाही तर काय?

जळगाव जिल्हा
स्टार भारत लाईव्ह
संपादकीय
मत विकणारा समाज लोकशाहीचा खून करत असतो हे कटू असलं तरी सत्य आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवाराच्या दारात रांग लावून उभे राहणारे लोक १०००–२००० रुपयांत आपले मत विकतात आणि नंतर “मला जास्त मिळाले” असा अभिमान मिरवतात. हा अभिमान नाही, ही स्वाभिमानाची उघड उघड विक्री आहे. ज्यादिवशी मत विकले जाते, त्याच दिवशी लोकशाहीची किंमत ठरवली जाते आणि ती किंमत धक्कादायकरीत्या कमी असते.
सर्वांनाच माहीत आहे की कोणत्या भागात किती दर चालतो. कोणाला पैसे कुठून येतात, कोण देतो, कशासाठी देतो हे काही गुपित उरलेले नाही. तरीही “सगळेच घेतात” या बिनधास्त सबबीखाली गुन्हा सामान्य करून टाकला जातो. पण प्रश्न असा आहे जर सगळेच चुकीचे करत असतील, तर बरोबर उभं राहण्याचं धाडस कुणी करायचं?
याच समाजात शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मात्र सरळसरळ लुटले जातात. अनुदान खात्यावर येते, पण शेतकऱ्याच्या हातात पोहोचत नाही. दलाल, भ्रष्ट अधिकारी, बनावट कागदपत्रांचे कारखाने—सगळे मिळून शेतकऱ्याच्या घामावर ताव मारतात. ही लूट दिवसा-ढवळ्या सुरू असते. तरीही याविरोधात आवाज आंदोलन? रस्त्यावर उतरणे त्यासाठी वेळ नाही
मत विकण्यासाठी मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ आहे
हा विरोधाभास नाही, ही मानसिक गुलामी आहे. जे लोक आपल्या हक्कासाठी चार तास उभे राहू शकत नाहीत, ते परक्यांच्या पैशासाठी दिवसभर उभे राहतात. हे दुर्दैव नाही तर लाजिरवाणे सत्य आहे. निवडणुकीत मिळणारे काही हजार रुपये पोटभर देतात, पण अनुदानातील लाखोंची लूट आयुष्यभर कंबर मोडते. कर्ज वाढते, शेती उद्ध्वस्त होते, पोरांचं भविष्य अंधारात जातं—आणि तरीही शांतता!
मत म्हणजे दान नाही, तो सौदा नाही. मत हा नागरिकाचा अधिकार आहे, ताकद आहे, शस्त्र आहे. ते २००० रुपयांत विकणारा माणूस उद्या भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार गमावतो. आणि हक्काचे पैसे लुटले जात असताना जो गप्प बसतो, तो अन्यायाचा भागीदार ठरतोहे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे.
शेतकरी अनुदानातील अपहार हा एखाद्या व्यक्तीचा प्रश्न नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचा काळा डाग आहे. आणि हा डाग पुसला जाणार नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरणे, आवाज उठवणे, संघटित होणे हे अपरिहार्य आहे. फक्त तक्रारी करून काही होणार नाही. गप्प बसलेला समाज कधीच न्याय मिळवत नाही; न्याय मिळतो तो संघर्षातूनच.
आज जो माणूस निवडणुकीत पैसे घेऊन उभा आहे, तोच उद्या आपल्या मुलांसाठी प्रश्न विचारणार नसेल, तर ती केवळ त्याची नव्हे संपूर्ण समाजाची शोकांतिका असेल. स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आधी आरशात पाहावे.
हक्क लुटले जात असताना शांत बसणे आणि मत विकताना अभिमान मिरवणे—याला स्वाभिमान म्हणायचे नसेल, तर मग याला काय म्हणायचे?
आता तरी ठरवले पाहिजे गुलामी स्वीकारायची की संघर्ष.
कारण आज आवाज उठवला नाही, तर उद्या ओरडायलाही कोणी उरणार नाही.



