देऊळगाव राजा तालुक्यात बैलपोळा साधेपणाने साजरा; आमदार मनोज कांयदे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा :तालुक्यासह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, सोयाबीन, कापूस यासह विविध पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. अशा मोठ्या संकटाच्या परिस्थितीतही, वर्षभर शेतात घाम गाळणाऱ्या आणि पिकांसाठी राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुक्यात पारंपरिक बैलपोळा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
बैलपोळ्याच्या या पावन निमित्ताने आमदार मनोज कांयदे यांनी आपल्या मूळ गावी उंबरखेड येथे सहपरिवार बैलपोळा साजरा केला. यावेळी त्यांनी पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करून बळीराजाप्रती आदर व्यक्त केला.
सध्याच्या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवत आमदार मनोज कांयदे यांनी शेतकऱ्यांना मोठा धीर दिला. ते म्हणाले, “आज निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, पिके करपली असून आमचा बळीराजा चिंतेत आहे. अशा बिकट आणि संकटसमयी मी शेतकऱ्यांची साथ कधीही सोडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी एक जनसेवक म्हणून मी ठामपणे उभा राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आमदार म्हणून मला जे जे करता येईल, ते मी सर्व स्तरावर करेन,” असा खंबीर विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी आमदार मनोज कांयदे यांनी उंबरखेड येथील गावकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधत सर्वांना बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मातीशी, गावाशी आणि आपल्या माणसांशी असलेलं नातं जपणारा हा सण नेहमीच मनाला आनंद देणारा असतो, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



