बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा तालुक्यात दुष्काळ जाहीर

Trigger-1 अंतर्गत 265 तालुक्यांचा समावेश; पंचनाम्यांचे निर्देश, पीक नुकसान मदतीचा निर्णय स्वतंत्रपणे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा, दि. 26 : खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भात 25 सप्टेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी केला असून, बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांचा समावेश असलेल्या यादीत देऊळगाव राजा तालुक्याचाही समावेश आहे.

शासन निर्णयानुसार तालुक्यातील संबंधित क्षेत्रात पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करून पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करावा लागणार आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषांत शिथिलता अशा सवलती लागू करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे, अन्नधान्य व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे तसेच पिण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मात्र, देऊळगाव राजा तालुक्यातील शेतपिकांच्या नुकसानीबाबतची आर्थिक मदत या शासन निर्णयातून जाहीर झालेली नाही. विहित कार्यपद्धतीची पूर्तता केल्यानंतर शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पंचनामे व पीक परिस्थितीच्या सर्वेक्षणाकडे तसेच त्यानंतर शेतपिकांच्या नुकसानीबाबत शासनाकडून जाहीर होणाऱ्या स्वतंत्र मदतीच्या निर्णयाकडे लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button