देऊळगाव राजात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

घरातून बाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी परतलीच नाही; देऊळगाव राजात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : शहरातील त्र्यंबकनगर परिसरातून १६ वर्षे ८ महिन्यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी त्र्यंबकनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. ९ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास ती घरातून बाहेर गेली. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही.
मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. देऊळगाव राजा शहरातील नातेवाईकांकडे तसेच संभाव्य ठिकाणी चौकशी करून तिचा शोध घेण्यात आला. मात्र, विविध ठिकाणी शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही.
यानंतर नातेवाईकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत, अज्ञात व्यक्तीने फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवून नेले असावे, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी १० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान गिते यांनी केली.
दरम्यान, अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली असून, पोलिसांकडून तिचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्याबरोबरच मुलगी कोणाच्या संपर्कात होती, ती घराबाहेर गेल्यानंतर कुठे गेली आणि तिच्या बेपत्ता होण्यामागे नेमके कारण काय, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे..



