दानशूरांच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तरांचे वाटप; जे ई स्कूलमध्ये सामाजिक बांधिलकीचा आदर्श

दानशूरांच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तरांचे वाटप; जे ई स्कूलमध्ये सामाजिक बांधिलकीचा आदर्श
‘कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये’; मुक्ताईनगरात प्रेरणादायी उपक्रम
मुक्ताईनगर | प्रतिनिधी :
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत जे ई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी गणवेश आणि शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक एस. एम. वाढे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला दानशूर प्रमोद हरी भारंबे (मुक्ताईनगर) आणि मिलिंद पाटील (मुंबई) यांनी आर्थिक सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एस. आर. ठाकूर यांनी प्रास्ताविकातून शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे सांगितले.
यानंतर प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे आणि के. आर. कवळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तरांचे वितरण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधानाचा भाव उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी आपल्या मनोगतात अशा सामाजिक उपक्रमांना शाळेचे नेहमीच प्रोत्साहन राहील, असे सांगत शिक्षकांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी अशाच कृतीतून निभावली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच एस. एम. वाढे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुकही त्यांनी केले.
यावेळी एस. एम. वाढे यांनी प्राचार्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगून सर्व दाते, शिक्षक व सहकाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मोलाचा आधार मिळाला असून उपस्थितांनी दात्यांच्या सामाजिक योगदानाचेही कौतुक केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



